देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2024 13:31 IST2024-11-18T13:31:10+5:302024-11-18T13:31:18+5:30
निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिस हेलिकॉप्टरकडे आल्यानंतर आम्हाला तपासणी करीत असल्याची विनंती केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस लांब जाऊन उभे राहिले.

देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : नाशिकच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने चांदवड येथील सभा आटोपून सायंकाळी ४:४५ वाजता आले. तेव्हा नीलगिरी बाग येथील हेलिपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी फडणवीस यांची बॅग तपासली. त्यांच्या सेक्रेटरीने बेंग चैन उघडून दाखविली. तेव्हा लेझरच्या बॅगेत निळ्या रंगाचे पाऊच होते. त्यात फडणवीस यांना लागणाऱ्या गोळ्या होत्या. तर मागील दोन बॅगांमध्ये कपडे व फाइल होती.
निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिस हेलिकॉप्टरकडे आल्यानंतर आम्हाला तपासणी करीत असल्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा फडणवीस लांब जाऊन उभे राहिले. नंतर तपासणी पथकाने पाठीमागे साहित्य ठेवण्यासाठी असलेला बॉक्स उघडून दाखविण्याची विनंती केली. त्यानंतर तेथील दोन बॅगाही उघडून दाखविण्यात आल्या. त्यात कपडे होते. सात मिनिटांच्या तपासणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी अनंत कान्हेरे मैदानाकडे रवाना झाले.