स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:31 IST2026-02-20T16:30:45+5:302026-02-20T16:31:49+5:30
उमेदवारी ठरविण्यात पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक; बोलकर, सानप, कुलकर्णी यांच्यात स्पर्धा
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून अनेक दावेदार असले तरी माधुरी बोलकर, मच्छिंद्र सानप आणि डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.
सोमवारी (२३ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून शक्यतो एकच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवारी ठरविण्यात पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती पक्षीय तौलनिक बळानुसार गेल्या सोमवारी (दि.१६) झाली आहे. यात भाजपचे नऊ सदस्य असून यात माधुरी बोलकर, मच्छिंद्र सानप, डॉ. दीपाली कुलकर्णी, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांचा समावेश आहे.
तसेच शिंदेसेनेकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे तसेच त्यांच्या समवेत गट नोंदणी करणाऱ्या मनसेच्या मयूरी पवार यांचा समावेश आहे.
उद्धवसेनेकडून योगेश गाडेकर आणि भारती ताजनपुरे तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) अपक्ष मुकेश शहाणे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर पद नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाकडे गेल्याने सभापती पद पूर्व किंवा सातपूरकडे जाण्याची शक्यता आहे.
सोशल इंजिनिअरिंग
महापालिकेत भाजप सोशल इंजिनिअरिंग करणार असून महापौर खुल्या प्रवर्गातील असल्याने स्थायी समिती सभापतिपद ओबीसींकडे जाण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा आहे. सध्या पक्षात ज्येष्ठतेनुसार डॉ. दीपाली कुलकर्णी, मच्छिंद्र सानप आणि माधुरी बोलकर दावेदारी आहेत. महिलेला सभापतिपद दिल्यास महापालिकेत खऱ्या अर्थाने महिला राज असणार आहे.