जिल्हा परिषद निवडणूक नंदुरबार: भाजप स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 12:48 IST2019-12-09T12:44:43+5:302019-12-09T12:48:34+5:30
भाजप निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सर्व गटात आणि गणात पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक नंदुरबार: भाजप स्वबळावर लढणार
नंदूरबार : जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार आहे. ९ ते ११ डिसेंबरपर्यंत तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद नियडणुकांसदर्भात भाजपच्या भूमिकेबाबत माहिती देतांना विजय चौधरी यांनी सांगितले, पक्षाची उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक नुकतीच जळगाव येथे झाली. बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे सध्या तरी भाजप निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सर्व गटात आणि गणात पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ९ डिसेंबर रोजी सकाळी धडगाव व दुपारी तळोदा तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. १० रोजी सकाळी नंदुरबार तर दुपारी शहादा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती तर ११ रोजी सकाळी अक्कलकुवा व दुपारी नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होतील.
सर्व मुलाखती या त्या त्या तालुका मुख्यालयात होणार आहे. आपणासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, पदाधिकारी निलेश माळी, जयपाल रावल, राजेंद्र गावित, राजेंद्रकुमार गावीत, दीपक पाटील, डॉ.शशीकांत वाणी, नागेश पाडवी व भरत गावीत उपस्थित राहणार आहेत. इच्छुकांची नावे निश्चित करून ती प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येतील, त्यानंतर ती नावे जाहीर केली जातील. पक्षात कुठलीही गटबाजी नाही, कुणीही नाराज नाही. त्यामुळे एकसंघपणे निवडणुका लढवून जिल्हा परिषद व सहाही पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी पक्ष तयारीला लागल्याचे चौधरी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या मुलाखती ऐनवेळी रद्द
काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती ८ रोजी होणाऱ्या होत्या. त्यासाठी सर्वाना कळविण्यात देखील आले होते. परंतु या मुलाखती ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. तसेच जिल्हा प्रभारी व निरीक्षकांचा दौरा पुढे ढकलला गेल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या आज मुलाखती
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती ९ रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहावर होणार आहेत. पक्ष निरीक्षक नाना महाले, माजी आमदार शरद गावीत यावेळी उपस्थित राहतील.