Video: ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टर जंगल जळून खाक; बांबू रोपवन अन् गवताची होती लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:46 IST2021-03-02T12:45:43+5:302021-03-02T12:46:31+5:30
नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत वनविभागाची ठाणेपाडा गावाजवळ रोपवाटिका आहे.

Video: ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टर जंगल जळून खाक; बांबू रोपवन अन् गवताची होती लागवड
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील राखीव वनक्षेत्राला आग लागून ३०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास लागलेली आग मंगळवारी सकाळी आठ वाजता आटोक्यात आली.
नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत वनविभागाची ठाणेपाडा गावाजवळ रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेपासून साक्री तालुक्यातील सिंदबनपर्यंत ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे. रोपवाटिकेलगत वनविभागाने ४०० हेक्टर वनक्षेत्र राखीव ठेवत त्याठिकाणी बांबू रोपवन व गवताची लागवड केली होती. सोमवारी रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास या राखीव वनक्षेत्रात आग लागल्याचे ठाणेपाडा ग्रामस्थांना दिसून आले.
अवघ्या काही वेळात ही आग फोफावून आसपास जंगलात वाढत गेली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्रत अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल आणि वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतू जोरदार हवेमुळे आग पसरत राहिल्याने आटोक्यात आणणे मुश्किल होत होते.
अग्नीशमन बंब बोलावूनही फरक पडत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्यासह ग्रामस्थांनी धाडस करुन वनकर्मचा-यांसोबत गवताळ भागात खोदकाम तसेच गवत कापणी सुरु करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ३०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी पहाटेपासून गवत कापण्यास सुरुवात केल्याने सकाळी आठ वाजता आग आटोक्यात आली.
ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टर जंगल जळून खाक; बांबू रोपवन अन् गवताची होती लागवड pic.twitter.com/qe51NZyl3d
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021
आगीत बांबू रोपवन व गवत जळून खाक झाले असून वन्यप्राणी यातून बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे. या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत. हे सर्व प्राणी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासून या भागात पंचनामे करत आहेत. दरम्यान एक मोराला आगीची झळ बसल्याची माहिती देण्यात आली आहे.