maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 15:26 IST2019-12-04T15:21:50+5:302019-12-04T15:26:46+5:30
पाडवी हे सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांना काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे सरकार असताना राज्यमंत्री पदासाठी निमंत्रण होते.

maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग'
नंदूरबार : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने त्यासाठी मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक आमदार यांनी दिल्लीत ठाणे मांडले आहे. विशेषत काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार अॅड. के.सी.पाडवी यांचे नाव आघाडीवर असून त्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार फिल्डिंग सुरु आहे.राज्यात नाट्यमय अनेक घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह केवळ सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. सत्ताधारी पक्षापैकी जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यात आमदार के.सी.पाडवी व आमदार शिरीष नाईक यांचा समावेश आहे. हे दोन्ही आमदार राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने दोघांनी मंत्रीपदाचा दावा केला आहे.
पाडवी हे सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांना काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे सरकार असताना राज्यमंत्री पदासाठी निमंत्रण होते. मात्र त्यांनी राज्यमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला होता. नुकतीच त्यांनी लोकसभा निवडणूक ही लढवली. त्यात पराभूत झाले असले तरी त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. पक्षांतराच्या वातावरणात अनेकांनी पक्ष सोडला असला तरी ते पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत त्यांना राज्यात महत्त्वाचे स्थान पक्षांनी दिले होते.
सत्ता स्थापनेतही पक्षाच्या समितीत ते होते. त्यामुळे सहाजिकच मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. सध्या ते दोन दिवसांपासून दिल्लीतच पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. अर्थात त्यांचे नाव आघाडीवर असले तरी आमदार शिरीष नाईक हे देखील प्रबळ दावेदार आहेत. माजीमंत्री व ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे ते पुत्र असून त्यांचा गांधी घराण्याशी जवळचा संबंध आहे.
दिल्लीत त्यांचे वजन असल्याने शिरीष नाईक यांचीदेखील मंत्रीपदासाठी वर्णी लागू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. जिल्ह्यातील व राज्यातील काही नेते देखील त्यांच्यासाठी प्रयल करीत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षात ऐनवेळी काहीही घडू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून त्यामुळे मंत्रीपदासाठी आमदार अॅड, के सी.पाडवी की शिरीष नाईक या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.