आधी मतदान, नंतर लगीन; नवरदेवाने मंडपात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 18:23 IST2024-04-26T18:23:15+5:302024-04-26T18:23:57+5:30
- मारोती चिलपिपरे कंधार( नांदेड ) : लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ...

आधी मतदान, नंतर लगीन; नवरदेवाने मंडपात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क
- मारोती चिलपिपरे
कंधार( नांदेड) : लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा, महत्वाचा प्रसंग. पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत कंधार तालुक्यातील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी, लग्नाच्या वरात घोड्यावर बसण्यापूर्वी नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि मतदानाचा हक्क बजावला. आधी मतदान, मग लगीन अशा त्याच्या बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून नांदेड लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच युवक, नागरिक मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.
दुर्गातांडा येथील सचिन नामदेव राठोड व शिवानी नामदेव चव्हाण यांचा विवाह सोहळा २६ रोजी आयोजित केला होता. दरम्यान, नवरदेव सचिन याने मतदानाचे कर्तव्य बजावून विवाह मंडपात जाण्याचे ठरवले. त्यानुसार सचिनने प्रथम मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. त्यानंतरच मंडपात विवाहासाठी तो सज्ज झाला. नवरदेवाचा हा उत्साह त्याचे कौतुक होत आहे.
योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं, असं सचिनने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने यावेळी केलं.