राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:10 IST2025-12-27T20:09:35+5:302025-12-27T20:10:41+5:30
नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता
- श्रीनिवास भोसले
नांदेड : राज्यातील राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेसेना सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र येत युतीचा नारा दिला, तर पुण्यात काका - पुतण्यांची जवळीक वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. स्थानिक नेत्यांचे मतभेद असूनही नेत्यांच्या आदेशानुसार भाजप - शिंदेसेना एकत्र लढेल, असे चित्र आहे.
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, भाजपने सर्वाधिक जोर लावला आहे. त्यापाठोपाठ सत्ताधारी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तयारीत असून, खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसही विरोधकांशी दोन हात करण्यास सज्ज आहे. सध्या सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करत असले तरी आगामी काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते.
राज्य पातळीवर झालेल्या निर्णयानुसार स्थानिक नेत्यांची इच्छा नसतानाही भाजप आणि शिंदेसेना नांदेडमध्ये एकत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षांतील नेत्यांचे स्थानिक स्तरावर फारसे जुळत नसले, तरी निवडणूक रणनीती म्हणून तडजोडीची भूमिका घेतली जाऊ शकते. तसे झाल्यास जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. विशेषतः मुस्लीम आणि दलितबहुल मतदार असलेल्या २२ ते २५ जागांवर कोण उमेदवार देणार, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फारसे प्राबल्य नसले, तरी राज ठाकरे यांना मानणारा एक गट आहे. हा गट उद्धव ठाकरे यांच्या सेनेसह एकत्र येऊ शकतो. राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार, हे उमेदवारी अर्ज उचलण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
महायुतीचे नेते एकमेकांच्या संपर्कात
शिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील हे सध्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिक संपर्कात आहेत. मात्र, त्याचवेळी हेमंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे 'जुने मैत्रिपूर्ण' संबंधही पुन्हा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे - मुंबई विमान प्रवासादरम्यान उभय नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे भाजप - शिंदेसेना पुन्हा एकत्र आल्यास सत्ताधारी मित्रपक्ष म्हणून नवे राजकीय गणित जुळल्यास आश्चर्य वाटू नये.
काका-पुतण्यांची जवळीक आणि पर्यायी आघाड्या
शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे काका - पुतणे पुण्यात एकत्र आले, तर राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ला महायुतीबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी परंपरागत काँग्रेससोबत हातमिळवणी करून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करू शकते. यामुळे मुस्लीम आणि दलित मतांचे ध्रुवीकरण टाळणे सोपे होईल. याच दिशेने पहिले पाऊल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान पडल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांनी घेतलेली ॲड. आंबेडकरांची भेट ही संभाव्य राजकीय हालचालींचा भाग मानली जात आहे.
अशोकराव चव्हाणांची खेळी पुन्हा रंगणार?
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण यांनी खेळलेली रणनीती यशस्वी ठरली होती. तसेच सर्वच पक्षांचे गणित बिघडवत २०१७मध्ये त्यांनी महापालिकेत ७३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळवले होते. यंदाही वेगळ्या आघाडी किंवा पक्षाच्या माध्यमातून तसाच प्रयोग केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या ११ माजी नगरसेवकांनी अचानक एमआयएममध्ये प्रवेश करणे, हे त्याच डावपेचाचे संकेत मानले जात आहेत. हिंदूबहुल भागात भाजप - शिंदेसेनेची सरशी मानली जात असली, तरी मुस्लीम आणि दलित मतदार असलेल्या जवळपास २२ ते २५ जागांवर कोण बाजी मारतो, यावर महापालिकेतील सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या जागांवरील उमेदवार निवड आणि आघाडीचे गणित निर्णायक ठरणार आहे.