नांदेडमध्ये शिंदेसेनेला भाजपचा धक्का;अधिकृत उमेदवाराची माघार,चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:26 IST2026-01-02T14:23:45+5:302026-01-02T14:26:23+5:30
तिकीटासाठी उमेदवार भाजपमधून शिवसेनेत अन् पुन्हा अशोक चव्हाणांकडे...

नांदेडमध्ये शिंदेसेनेला भाजपचा धक्का;अधिकृत उमेदवाराची माघार,चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास!
नांदेड: नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शुक्रवारी एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक ५ मधून शिंदेसेनेचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार महेंद्र पिंपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पिंपळे यांना पक्षाने एबी फॉर्म (अधिकृत उमेदवारी) दिला होता, तरीही त्यांनी माघार घेतल्याने शिंदेसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमधून शिवसेनेत अन् पुन्हा अशोक चव्हाणांकडे...
महेंद्र पिंपळे हे मुळचे भाजपचे कार्यकर्ते होते. मात्र, भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी ऐनवेळी शिंदेसेनेत प्रवेश करून प्रभाग ५ मधून उमेदवारी मिळवली होती. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी नाट्यमयरीत्या माघार घेतली. "मी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात काम करणार आहे," असे म्हणत त्यांनी चव्हाणांच्या गटात पुन्हा सामील होण्याचे संकेत दिले आहेत.
महायुतीत अंतर्गत धुसफूस?
पिंपळे यांच्या या निर्णयामागे भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराला ताकद देण्यासाठी आणि महायुतीतील मते फुटू नयेत यासाठी अशोक चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन पिंपळे यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्याने शिंदेसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची मोठी अडचण झाली आहे. या माघारीमुळे प्रभाग ५ मधील लढतीचे समीकरण आता पूर्णपणे बदलले असून भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.