नांदेड मनपावर ‘कमळ’ फुलले; काँग्रेसच्या हाताने ताकद दाखविली, शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:12 IST2026-01-17T19:12:01+5:302026-01-17T19:12:49+5:30
मतदारांनी नांदेडमध्ये पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत केवळ ‘कमळ’ पाहून मतदान केले.

नांदेड मनपावर ‘कमळ’ फुलले; काँग्रेसच्या हाताने ताकद दाखविली, शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का
नांदेड : नांदेड अन् अशोकराव चव्हाण हे समीकरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर जुन्या-नव्याचा समेट घडून आणत खासदार डाॅ. अजित गोपछडेंसह काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत महापालिका निवडणुकीची रणनीती आखली. त्यात मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाणांनी प्रभागाची रचना ते उमेदवारांची निवड, जातीय समीकरणे जुळवत दिलेली लढत पूर्णपणे यशस्वी झाली असून ८१ पैकी तब्बल एकूण ४५ जागांवर भाजपने यश मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महापालिकेत युती होईल, असे बोलले जात होते. मात्र, पूर्वीपासूनच स्थानिक नेतृत्वांनी स्वतंत्र लढण्याचा वारंवार उल्लेख केला आणि शेवटच्या टप्प्यात युतीदेखील तुटली. त्यातून भाजपने स्वतंत्र उमेदवार देत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात ताकदीनिशी लढत दिली आणि एकतर्फी विजय मिळविला. दुसरीकडे, शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या अभावाचा फटका बसला.
नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिंदेसेनेचे वर्चस्व असल्याने शहरात नांदेडकर मतदार आम्हालाच साथ देतील, हा शिंदेसेनेच्या आमदारांचा दावा फेल ठरला आहे. युतीमध्ये भाजपकडून आठ ते दहा जागा देण्याचे मान्य केले गेले होते; परंतु, शिंदेसेनेच्या आमदारांना अधिक जागा हव्या होत्या. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांचा आत्मविश्वास होता; मात्र हा आत्मविश्वासच त्यांना नडला. मतदारांनी नांदेडमध्ये पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत केवळ ‘कमळ’ पाहून मतदान केले. त्यात जुन्या-नव्याच्या वादात राज्यसभा सदस्य डाॅ. अजित गोपछडे आणि काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी अशोकरावांचे नेतृत्व मान्य करत त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्याचाही फायदा भाजपला झाला आणि नांदेड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला.
आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात लढलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला खातेदेखील उघडला आले नाही. अर्ध्या नांदेडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची युती, त्यातही काही जागांवर आमनेसामने आणि उत्तरमध्ये स्वतंत्र उमेदवार हे गणित नांदेडकरांना पटले नाही.
शिंदेसेनेचे दोन आमदार आणि एक विधानपरिषद सदस्य असताना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आमदार हेमंत पाटील यांचे दक्षिणमधील ‘मॅनेजमेंट’ चुकले अन् आमदार आनंद बोंढारकर यांचाही प्रभाव पडला नाही; तर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांना त्यांनी केलेल्या कामांचा अतिविश्वास नडला. त्या तुलनेत काँग्रेस आणि एमआयएमची कामगिरी चांगली राहिली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही नांदेड महापालिकेत एंट्री केली आहे.