अडीचशे रूपयांत लढविली होती निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:14 AM2019-04-01T00:14:36+5:302019-04-01T00:17:24+5:30

खिशात २५० रूपये, हातात पिशवी, त्यामध्ये एक चादर, कपडे अन् बांधून घेतलेल्या भाकरी, एवढी सामग्री सोबत घेवून कधी पायी तर कधी बैलगाडीत प्रचार करीत नांदेड लोकसभेची १९५२ ची निवडणूक स्वा़ सै़ देवराव नामदेवराव कांबळे (अण्णा) यांनी लढविली आणि जिंकलीही. या विजयामुळे नांदेड लोकसभेचे पहिले खासदार असा त्यांनी इतिहास रचला.

he contest lok sabha election only two hundred and fifty rupees | अडीचशे रूपयांत लढविली होती निवडणूक

अडीचशे रूपयांत लढविली होती निवडणूक

googlenewsNext
ठळक मुद्देनांदेड लोकसभा मतदारसंघ १९५२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे देवराव कांबळे विजयी

भारत दाढेल।
नांदेड : खिशात २५० रूपये, हातात पिशवी, त्यामध्ये एक चादर, कपडे अन् बांधून घेतलेल्या भाकरी, एवढी सामग्री सोबत घेवून कधी पायी तर कधी बैलगाडीत प्रचार करीत नांदेड लोकसभेची १९५२ ची निवडणूक स्वा़ सै़ देवराव नामदेवराव कांबळे (अण्णा) यांनी लढविली आणि जिंकलीही. या विजयामुळे नांदेड लोकसभेचे पहिले खासदार असा त्यांनी इतिहास रचला.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच झालेल्या १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा द्विमतदारसंघ होता़ सर्वसाधारण गटातून एक व अनुसूचित जातीमधून एक असे दोन लोकप्रतिनिधी निवडूनयेणार होते़ काँग्रेस पक्षाकडून राखीव जागेवर निवडणूक लढविण्यासाठी पाथरी (जि़ परभणी) येथील देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली़ मातंग समाजाचे देवराव कांबळे यांचे शिक्षण मॅट्रीकपर्यंत झाले होते़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, पुरणमल लाहोटी, बाबासाहेब परांजपे यांच्या शिफारशीमुळे देवराव कांबळे यांना उमेदवारी मिळाली़ त्या आठवणी जागे करताना देवराव कांबळे यांचे धाकटे बंधू पाथरी येथील अ‍ॅड़ मारोतराव कांबळे (नाना) यांनी सांगितले, अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक होते़ स्वामी रामानंद तीर्थ यांचा अण्णावर खूप विश्वास होता़ रजाकाराच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी जो लढा उभारला होता़ त्यात अण्णांनी सक्रिय सहभाग घेतला होता़ त्यामुळे नांदेडच्या राखीव जागेवर अण्णांना उभे करण्याचा निर्णय स्वामी रामानंद तीर्थ यांनी घेतला़ त्यावेळी अण्णा शिक्षक म्हणून नोकरी करत होते़
सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे शंकरराव श्रीनिवास टेळकीकर तर राखीव मतदारसंघातून देवराव कांबळे यांना तिकीट मिळाले़ त्यांच्या विरोधात शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे विदर्भातील कंत्राटदार गोविंदराव मेश्राम उभे होते़ काँग्रेसचे नेते शंकरराव चव्हाण यांनी प्रचाराची धुरा सांभाळली़ उमेदवार असलेले अण्णा खिशात अडीचशे रूपये व हातात एक पिशवी घेवून गावोगावी जावून प्रचार करायचे़ कधी पायी तर कधी बैलगाडीने प्रवास करीत गाववस्तीवर मुक्काम करून मिळेल ते खावून अण्णांनी प्रचार केला़ लोकंही अण्णांना मदत करायचे़ शेतात जावून अण्णा मतदारांना भेटायचे़ मतदारच अण्णांच्या राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करायचे़ त्यावेळी निवडणूक निशाणी बैलजोडी होती़
या निवडणुकीत अण्णांचा विजय झाला़ कारण, पंडित जवाहरलाल नेहरू यांची लोकप्रियता व तिरंगा झेंडा पाहूनच मतदार काँग्रेसला मतदान करायचे़ १९५७ च्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर काँग्रेसकडून दिगंबरराव बिंदू यांना उमेदवारी दिली़ तर राखीव जागेवर पुन्हा देवराव कांबळे यांनाच उभे केले़ त्यावेळी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे हरिहरराव सोनुले हे अण्णांच्या विरोधात उभे होते़ ही निवडणूकही अण्णांनी जिंकली़ दिगंबरराव बिंदू यांचा मात्र पराभव झाला़ हरिहरराव सोनुले यांना दुसऱ्या क्रमांकाचे मतदान मिळाल्यामुळे ते पराभूत होवूनही त्यांना खासदारकीची संधी मिळाली़ त्यावेळी या कायद्यामुळे नऊ मतदारसंघात असेच चित्र घडले होते़
रिफ्युजी समितीवर देवराव कांबळे यांचे कार्य
पहिल्या लोकसभेत भारत, पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या अनेक प्रश्नांची मालिकाच समोर होती़ पाकिस्तानात जे हिंदू राहत होते, ते आपली संपत्ती त्याच ठिकाणी सोडून भारतात परतले़ त्या सर्व निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी रिफ्युजी समितीवर होती़ या समितीवर खा़ देवराव कांबळे यांची निवड पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केली होती़ या निवडीबद्दल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा खा़ देवराव कांबळे यांचे अभिनंदन केले होते़ खा़ देवराव कांबळे यांनी रांत्रदिवस अभ्यास करून हे अंत्यत जोखमीचे काम पूर्ण केले़
१९५७ ची निवडणूक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देवराव नामदेवराव कांबळे यांना १ लाख ७७ हजार २७५ मते मिळाली तर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे हरिहरराव सोनुले यांना १ लाख ४९ हजार ६६७ मते मिळाली़
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबरराव बिंदू यांना १ लाख ४६ हजार ६९८ मते मिळाली़ चौथे उमेदवार विजेंद्र काबरा हे पीएसपीचे उमेदवार यांना १ लाख ३२ हजार ८२ मते मिळाली़ या निवडणुकीत दिगंबरराव बिंदू यांचा पराभव झाला़ दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळालेले हरिहरराव सोनुले हे खासदार म्हणून घोषित झाले़
१९५२ निवडणूक
नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या ७ लाख १० हजार १४६ होती़ तर सहा उमेदवार उभे होते़ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देवराव नामदेवराव कांबळे हे राखीव तर शंकरराव श्रीनिवासराव टेळकीकर हे सर्वसाधारण जागेवर विजयी झाले़ कांबळे यांना १ लाख ३ हजार ८१८ मते मिळाली़ शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे गोविंदराव मेश्राम यांना ६७ हजार ७८८, पीडीएफचे रंगनाथराव नारायणराव रांजीकर यांना ६७ हजार ४४, एसपीचे सीताराम महादेवराव यांना ४४ हजार १०४ तर अपक्ष उमेदवार गोविंदराव तानाजी महाले यांना ३९ हजार १११ मते मिळाली़

Web Title: he contest lok sabha election only two hundred and fifty rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.