पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
By योगेश पांडे | Updated: December 31, 2025 19:36 IST2025-12-31T19:34:29+5:302025-12-31T19:36:49+5:30
Nagpur : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७ मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटातदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे.

Wife will campaign against husband! Former BJP mayor goes to mother's house due to husband's rebellion; Ticket distribution dispute directly at home
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७ मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटातदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे. अर्चना डेहनकर यांनी त्यांच्या पतीला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश न आल्याने अखेर अर्चना डेहनकर यांनी थेट भावाचे घर गाठले. निवडणूकीत मी भाजपचा प्रचार करणार असल्याने एकाच घरात परस्परविरोधी भूमिका नको म्हणून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विनायक डेहनकर हे मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांना विविध निवडणूकींमध्ये पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्यादेखील दिल्या. अर्चना डेहनकर या महापौरपदीदेखील होत्या. मात्र या निवडणूकीत पक्षाने विनायक डेहनकर यांना तिकीट नाकारले. त्यांच्या प्रभागातून कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळे यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे विनायक डेहनकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यातून अर्चना डेहनकर नाराज झाल्या व त्या त्यांच्या भावाकडे निघून गेल्या. याबाबत अर्चना डेहनकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला. मी माझ्या पतीला निवडणूकीत सहकार्य करणार नाही. मी भाजपसाठीच प्रचार करणार आहे व एका घरात राहून ते शक्य होणार नाही. त्यामुळेच मी काही दिवस भावाकडे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
बाहेरील उमेदवारांना तिकीट का दिले ?
१९८४ पासून मी भाजपचा कार्यकर्ता आहे. प्रभाग १७ मध्ये तरुण उमेदवारांना तिकीट दिली असती तर काहीच हरकत नव्हती. मात्र बाहेरील पक्षातून आलेल्या व बाहेरील प्रभागात राहणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली. यामुळेच मी नाराज असून अपक्ष अर्ज दाखल केला आहे, असे विनायक डेहनकर यांनी स्पष्ट केले.