पतीची जागा राखण्यासाठी पत्नी उतरली मैदानात; कोण कोण सौभाग्यवती रिंगणात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:17 IST2026-01-06T16:16:27+5:302026-01-06T16:17:05+5:30
Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला, तर काहींना दुसऱ्या उमेदवाराला सामावून घेण्यासाठी नमते घ्यावे लागले.

Wife enters the fray to retain her husband's place; Who are the lucky women in the fray?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला, तर काहींना दुसऱ्या उमेदवाराला सामावून घेण्यासाठी नमते घ्यावे लागले. यामुळे कुठे पतीच्या जागेवर पत्नीला कंबर कसावी लागली, तर कुठे पत्नीच्या जागी पतीला मैदानात उतरावे लागले. दोघांपैकी कुणीही लढत असले तरी यानिमित्ताने घरातच उमेदवारी राहिली आहे. कार्यकर्त्यांनाही आपलाच नेता किंवा वहिनी साहेब लढत असल्याचे समाधान लाभत आहे. या महिला उमेदवारांपैकी कुणाला पतीच्या जागी महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
उत्तर नागपुरातील भाजपचे माजी आ. डॉ. मिलिंद माने यांच्या पत्नी डॉ. सरिता यांचा सामना काँग्रेसच्या भावना लोणारे यांच्याशी होत आहे. डॉ सरिता या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. डॉ. मिलिंद माने यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्या प्रचारात आघाडीवर असायच्या. येथे प्राची भैसारे (राष्ट्रवादी अजित पवार), वर्षा श्यामकुळे (राष्ट्रवादी शरद पवार) व प्रीती बोदेले (बसप) यांनी आव्हान दिले आहे. डॉ. माने यांच्यासाठीही ही प्रतिष्ठेची लढाई आहे. विशेष म्हणजे, डॉ. माने यांनी यापूर्वी महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. अ.भा. काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्या जागी पत्नी कुमुदिनी गुडधे या प्रभाग ३८ मधून रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सामना पुन्हा एकदा राऊत कुटुंबाशीच होत असून, फक्त उमेदवार बदलला आहे. भाजपच्या उमेदवार प्रतिभा राऊत यांचे पती विनोद राऊत यांनी नुकतेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून डिगडोग नगरपरिषदेची निवडणूक लढविली होती. आता पत्नी भाजपकडून रिंगणात आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण डवरे यांच्या जागी पत्नी सीमा या प्रभाग १० मधून लढत आहेत. गेल्यावेळी अरुण डवरे हे स्वतः प्रभाग ११ मधून अपक्ष लढले होते व लक्षणीय मते घेतली होती. सीमा डवरे यांचा सामना भाजपचे माजी नगरसेवक रमेश चोपडे यांच्या पत्नी वैशाली चोपडे यांच्याशी होत आहे. वैशाली या भाजपच्या पदाधिकारी असून, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. गेल्या निवडणुकीत रमेश चोपडे हे या प्रभागातून लढले होते. यावेळी पत्नी वैशाली या किल्ला लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक २०-क मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांच्या पत्नी आशा पुणेकर या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सामना भाजपच्या रेखा निमजे व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अर्पणा वाठ यांच्याशी होत आहे.
पत्नीच्या जागेवर पती
प्रभाग १७ मध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेविका हर्षला साबळे यांच्या जागी आता त्यांचे पती मनोज साबळे हे भाजपकडून लढत आहेत.