निवडणूक काळात १६९ आरोपींकडे आढळली शस्त्रे; १० पिस्तुल, ९३ चाकू, २४ तलवारी जप्त
By योगेश पांडे | Updated: May 18, 2024 22:03 IST2024-05-18T22:02:14+5:302024-05-18T22:03:00+5:30
दोन महिन्यात १०.८३ लाखांची दारू तर ९९.४८ लाखांचे ड्रग्ज जप्त

निवडणूक काळात १६९ आरोपींकडे आढळली शस्त्रे; १० पिस्तुल, ९३ चाकू, २४ तलवारी जप्त
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता असताना नागपुरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली. दोन महिन्यातच १६९ आरोपींकडून शस्त्रे जप्त करण्यात आली व त्यात १० पिस्तुलांचादेखील समावेश होता.
१६ मार्च ते १७ मे या कालावधीत पोलिसांनी दारू, ड्रग्जविरोधात मोहीमच राबविली होती. सर्व पोलीस ठाण्यातील पथकांना कडक तपासणी करण्याचे निर्देश होते. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत ४७६ गुन्हे दाखल करण्यात आले व ५०९ आरोपींवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १०.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय एनडीपीएस कायद्याअंतर्गत ३४ प्रकरणांत ६२ जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून ९९.४८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर एमडी पावडरचादेखील समावेश होता.
९३ चाकू व २४ तलवारी जप्त
पोलिसांनी दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत १५७ गुन्ह्यांमध्ये एकुण १६९ आरोपींवर कारवाई केली. या आरोपींकडून १० पिस्तुले १९ काडतूसे, ९३ चाकू, ९ कोयते, २४ तलवारी, ३ भाले, एक गुप्ती अशी १५.७५ लाखांची शस्त्रे जप्त करण्यात आली.
- १३ जणांवर एमपीडीएची कारवाई
या कालावधीत १३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली व त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचप्रमाणे तहसील, अजनी, कपिलनगर व यशोधरानगर येथील ४ गुन्ह्यांत मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करत २२ गुन्हेगारांवर मकोका लावण्यात आला.