'आमचं कुठलंच भांडण नाही, प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला'; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:03 IST2026-01-21T13:51:55+5:302026-01-21T14:03:10+5:30
चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.

'आमचं कुठलंच भांडण नाही, प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला'; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं
चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. गटनेता निवडीच्या प्रक्रियेतून हा वाद उफाळून आला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या वादावर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'आमच्यात कोणताही वैयक्तिक किंवा राजकीय भांडण नाही, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाल्यामुळेच ही वक्तव्ये झाली असल्याचे वड्डेटीवार म्हणाले.
"संयमाने आणि एकत्रितपणे काम केल्यास हा वाद नक्कीच सुटेल, असा विश्वासही वड्डेटीवार यांनी व्यक्त केला. गेल्या २५ वर्षांपासून आपण चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत असून, प्रतिभा धानोरकर या अवघ्या सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या आहेत. ज्यांनी दशकानुदशके पक्षासाठी मेहनत घेतली, ज्यांच्यावर पक्ष उभा आहे, अशा जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून पक्ष पुढे जाणार का, हा खरा प्रश्न आहे. नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले, मात्र त्या निवडणुकीत खासदारांचा सहभाग अत्यल्प होता, असंही वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत दोघांनी मिळून एबी फॉर्मवर सह्या केल्या आणि सुमारे ६० जागांवर सहमतीने उमेदवारी ठरली होती. मात्र वसंत पुरके यांनी सहा जागांवर उमेदवारी कापण्यासाठी आग्रह धरला आणि त्यातून पक्षाचे नुकसान झाले, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्या सहापैकी केवळ दोनच उमेदवार निवडून आल्याचेही ते म्हणाले.
नगरसेवक फोडल्याच्या आरोपांवर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, कुठल्याही नगरसेवकाला जबरदस्तीने बोलावण्यात आलेले नाही. काही नगरसेवक स्वतःहून माझ्याकडे आले. हायकमांड आली की प्रत्यक्ष नगरसेवकांना विचारावे, सगळे स्पष्ट होईल. खासदार म्हणजे पक्षाचे मालक नसतात. नेते आणि खासदार दोघांचेही काम संयमाने करावे लागते, असंही ते म्हणाले.
मला अनेक प्रलोभने देण्यात आली
पक्ष सोडण्याच्या चर्चांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मला अनेक प्रलोभने देण्यात आली, पण मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. ‘मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही’ ही माझी ठाम भूमिका आहे. कार्यकर्ता जिथे आहे तिथेच राहतो, तोच पक्षाचा खरा आत्मा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज या संदर्भात बैठक होणार असून, प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस एकत्र राहील आणि लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.