उद्या मतदान, १६ जानेवारीला किती वाजता स्पष्ट होईल संपूर्ण निकाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:26 IST2026-01-14T17:25:12+5:302026-01-14T17:26:29+5:30
Nagpur : सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात; दहा झोनमध्ये मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था

Voting tomorrow, what time will the full results be clear on January 16?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. गुरुवारी, १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, शहरातील दहा झोन कार्यालयांमध्ये मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमसाठी २० टेबल आणि टपाल मतदानासाठी ४ टेबल ठेवण्यात आले आहेत. सर्व झोनमध्ये एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत स्पष्ट कल समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा निकाल जाहीर होण्यास काहीसा विलंब होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने मतदानासह मतमोजणीसाठीही संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी बूथनिहाय ईव्हीएमचे वितरण करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया प्रभावी व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व एक सहायक नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर मीडिया सेंटरची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रभागांची मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर मनपा निवडणूक होत असून, मागील वेळेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या २,७०० वरून ३,००४ पर्यंत वाढली आहे.
यंदा ३२१ संवेदनशील मतदान केंद्रे ओळखण्यात आली असून, त्यापैकी २५५ केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयातील कंट्रोल रूममधून संबंधित केंद्रांवरील घडामोडींवर थेट नजर ठेवता येणार आहे. यासाठीची संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक स्वरुपात सज्ज करण्यात आली आहे.
मनपा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
मतमोजणी प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस जवान किंवा होमगार्ड तैनात राहणार असून, कोणतीही वादग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास त्वरित नियंत्रण ठेवता येईल. मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने अनेक मतदारांची मतदान केंद्रे बदलली आहेत. त्यामुळे मतदान केंद्र शोधण्यासाठी मनपातर्फे जीपीएस लोकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासन सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
येथे होईल मतमोजणी
- लक्ष्मीनगर : गंगाधर फडणवीस क्रीडा संकुल, विवेकानंद नगर
- धरमपेठ : सेंट फ्रान्सिस दि सेल्म (एस.एफ. एस) कॉलेज, सेमिनरी हिल्स
- हनुमाननगर : ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक
- धंतोली : सामुदायिक भवन, रेल्वे विभाग, अजनी रोड, गुलमोहर कौलनी, वंजारी नगर
- नेहरूनगर : राजीव गांधी सभागृह, न्यू नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ
- गांधीबाग : नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी सांस्कृतिक सभागृह, ग्रेट नाग रोड, गणेशनगर
- सतरंजीपुरा : दि नागपूर टिंबर मर्चेंट असोसिएशन लकडगंज
- लकडगंज : विनायकराव देशमुख हायस्कूल आणि विज्ञान कनिष्ट महाविद्यालय ऐव्हीजी लेआऊट, लकडगंज
- आशीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, ललित कला भवन, ठवरे कॉलनी
- मंगळवारी : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, काटोल रोड, छावणी