नागपुरात मतदार यादीचा सावळागोंधळ; भाजप आमदाराचाच प्रभाग बदलला, कृष्णा खोपडेंना फटका
By योगेश पांडे | Updated: November 25, 2025 17:52 IST2025-11-25T17:51:03+5:302025-11-25T17:52:12+5:30
Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्यात बराच सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे.

Voter list confusion in Nagpur; BJP MLA's ward changed, Krishna Khopde hit
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्यात बराच सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांनादेखील याचा फटका बसला आहे. त्यांचे नाव दुसऱ्याच प्रभागात दाखविण्यात आले आहे. यावरून संतापलेल्या खोपडे यांनी तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे.
खोपडे यांचे निवासस्थान सतरंजीपुरा परिसरात आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे विधानसभा निवडणूकीच्या वेळी प्रभाग क्रमांक २१ मधील यादी क्रमांक १६३ मध्ये होते. मात्र आता प्रभागनिहाय याद्या झाल्यावर त्यांचे नाव याच यादी क्रं. १६३ मध्ये असले तरी यादीचे दोन भाग झाले आहेत. त्यांचे नाव असलेल्या यादीचा प्रभाग मात्र बदललेला असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांचे नाव दाखविण्यात येत आहे. एकच क्रमांकाचा बूथ दोन वेगवेगळ्या प्रभागात कसा काय आला असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी चौकशी केली असता त्यांच्यासह ४५३ मतदारांचा प्रभाग बदलण्यात आला आहे. अशा प्रकारची तफावत जवळपास सर्वच प्रभागात असून यावर तत्काळ युद्धस्तरावर पावले उचलून बदल करणे आवश्यक आहे. प्रभाग रचनेनुसार ज्या प्रभागातील मतदार त्या प्रभागात येतील या दृष्टीने प्रत्येक प्रभागात अधिकारी-कर्मचारी यांना फिल्डवर पाठवून चौकशी करायला हवी. झालेल्या प्रकाराबाबत मी स्वत: आक्षेप दाखल करणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.