"मुस्लिम भगिनीही सुरक्षित फिरायला हव्या, जो गुंडगिरी करेल त्याला..."; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:37 IST2024-11-05T19:35:26+5:302024-11-05T19:37:58+5:30
नागपुरात बोलताना नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"मुस्लिम भगिनीही सुरक्षित फिरायला हव्या, जो गुंडगिरी करेल त्याला..."; नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता नितीन गडकरी यांनी मुस्लिम महिलांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. गुंडगिरी संपवायची असून महिलांच्या सुरक्षेमध्ये जो पुढे येईल, त्याला फटकावलं पाहिजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. खड्डे पडणार नाहीत इतके मजबूत रस्ते आम्ही केले आहेत. मी महापालिकेच्या बदमाश ठेकेदारांना सांगितले आहे की, रस्त्यावर खड्डे असतील तर तुमच्या अंगावरही खड्डे पडतील. आता भीतीपोटी सर्व कामे बरोबर केली जातात असेही नितीन गडकरींनी म्हटलं.
नागपुरातील ताजबाग येथे एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे. "आम्ही ताजबागमधून गुंडगिरी हटवली. मी इथल्या पोलीस उपायुक्तांना सांगितले की, गांजा, चरस असे व्यवसाय करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा. जो गुंडगिरी करेल त्याला मारा. मुस्लीम समाजाच्या भगिनींनीही रात्री ताजबागच्या रस्त्यावर सुरक्षितपणे फिरता यायला हवं. त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या कोणत्याही गुंडाला मारा. कोणी काही बोलत असेल तर माझे नाव सांगा. मी काळजी करणार नाही. माझ्या आई आणि बहिणींची अब्रु सुरक्षित राहिली पाहिजे," असं नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.काँग्रेसने ६० वर्षात काय केले? जनतेला काहीही दिले नाही, उलट जातीवादी राजकारण करून लोकांच्या मनात विष कालवले. काँग्रेसने नेहमीच संविधानाचा अपमान केला आणि मुस्लिमांना सांगितले की भाजप सत्तेवर आला तर ते तुम्हाला मारतील. मी मुस्लिमांच्या हातांवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या पायाचे प्रत्यारोपण केले आहे. तेव्हा तुमची जात कोणती हे कधीच विचारले नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.
"आम्ही कधीही जातीवादी राजकारण केले नाही. मात्र काँग्रेसने लोकांच्या मनात विष पेरलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार लोकसभा निवडणुकीत करण्यात आला. आम्ही राज्यघटना बदलली नाही आणि बदलणारही नाही, उलट काँग्रेस पक्षाने संविधानाचे तुकडे केले," असल्याचे गडकरी म्हणाले.