हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकणार; प्रशासनाची अनास्था समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:32 IST2026-01-12T19:31:14+5:302026-01-12T19:32:16+5:30
Nagpur : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे.

Thousands of senior citizens will miss out on voting; Administration's apathy exposed
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या निवडणुकीबाबत निवडणूक आयोग व प्रशासनाची अनास्था कायम असल्याचे चित्र परत एकदा समोर आले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत नियमांत तरतूद असल्याने दोन्ही निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करता आले होते. मात्र, महानगरपालिका निवडणुकीत तशी सुविधा राहणार नाही. त्यामुळे शहरातील हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाने विविध पावले उचलली होती. त्यात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी थेट घरीच निवडणूक कर्मचारी जात होते. आयोगाने याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसारदेखील केला होता. मात्र, नागपूर महानगरपालिका निवडणुकीत याबाबत कुठलेही पाऊल अद्यापपर्यंत उचलण्यात आलेले नाही. सजग मतदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडून याबाबत वारंवार विचारणा होत आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांकडेदेखील कुठलेही उत्तर नाही.
प्रत्येक बूथवर जवळपास १० तरी मतदार ८५ वर्षांचे असून अनेकांना घराबाहेर निघणेदेखील शक्य नाही. अशा स्थितीत हजारो मतदार मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. याबाबत मनपा उपायुक्त निर्भय जैन यांना संपर्क केला असता राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत कुठलेही अधिकृत निर्देश आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अटीतटीच्या प्रभागांत प्रत्येक मत महत्त्वाचे
काही प्रभागांमध्ये उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी १० ते २० मतेदेखील महत्त्वाची ठरू शकतील. त्यामुळे त्या प्रभागात घराबाहेर निघू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताच आले नाही तर मोठा उलटफेर होऊ शकतो.
आम्ही मतदान कसे करावे?
कर्नलबाग येथील रहिवासी अनंत १ पाठक यांना प्रकृतीमुळे घराबाहेर निघणे शक्य नाही. माझी मतदान करण्याची इच्छा आहे. विधानसभेप्रमाणे यंदादेखील ज्येष्ठ नागरिकांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत कुठलीच सोय न झाल्याने आम्ही मतदान कसे करावे, असा प्रश्न सतावतो आहे. सजग नागरिक असूनदेखील मतदान करता न येणे निराशाजनक आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ही शंभर टक्के प्रशासनाची चूकच
याबाबत भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, त्याची कुठलीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही. मतदान हा सर्वांचा अधिकार आहे. मतदान वाढावे, निवडणूक अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. मात्र, ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत असेल व त्यांच्यासाठी काहीही नियोजन होणार नसेल तर ती प्रशासनाची शंभर टक्के चूक आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावला,