गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियात रेड अलर्ट; येत्या २४ तासात अत्याधिक पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:39 IST2025-07-25T12:38:38+5:302025-07-25T12:39:30+5:30
Nagpur : चंद्रपूर, भंडारा येथे शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

Red alert in Gadchiroli, Chandrapur, Bhandara, Gondia; Possibility of heavy rain in the next 24 hours
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात येत्या २४ तासात अत्याधिक पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.
रेड अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारीही या जिल्ह्यात दिवसभर श्रावणसरी सुरू होत्या. गोंदियात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ५१ मि.मी. पाऊस झाला, तर चंद्रपूर येथे ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली. गडचिरोलीतही पावसाची रिपरिप दिवसभर होती. नागपूरला मात्र ढगांनी दिवसभर शांतता बाळगली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
चंद्रपूर, भंडारा येथे शाळा-महाविद्यालयांना आज सुटी
चंद्रपूर : प्रादेशिक हवामान विभागाने भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शुक्रवारी सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्लासेसना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.