सैनिक अक्षय भिलकर यांना रामटेककरांनी दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:50 IST2023-11-15T16:50:00+5:302023-11-15T16:50:21+5:30
अंबाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सैनिक अक्षय भिलकर यांना रामटेककरांनी दिला अखेरचा निरोप
रामटेक (नागपूर) :सैनिक अक्षय अशोक भिलकर यांचा बेळगाव येथे कर्तव्यावर असताना १३ नोव्हेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला होता. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंबाळा स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अक्षय याचे पार्थिव सोमवारी सकाळी विमानाने नागपूरला आणण्यात आले. त्यानंतर, पुष्पहारांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनाने ते रामटेकला आले. यावेळी, रामटेक परिसरात विविध ठिकाणी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. आंबडी, मनसरवरून पार्थिव शीतलवाडी किट्स इंजिनिअरिंग काॅलेज मार्गाने रामटेक शहरात दाखल झाले. शीतलवाडी, पिंपळेश्वर मंदिर, आंबेडकर वाॅर्ड, गांधी चौक, लंबे हनुमान मंदिर अशा अनेक ठिकाणी रामटेकवासीयांनी अक्षयला श्रद्धांजली अर्पण केली.
‘रामटेकपुत्र अक्षय अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आ. आशिष जैस्वाल, माजी आ. डी.एम. रेड्डी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक, पर्यटनमित्र चंद्रपाल चौकसे, उदयसिंह यादव, विशाल बरबटे, रमेश कारामोरे यांनीही अक्षयच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंबाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव तिरंग्यात गुंडाळले होते. पोलिसांनी यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. अक्षय यांच्या पार्थिवाला वडील अशोक भिलकर यांनी मुखाग्नी दिला.
एकुलता एक पुत्र
- एकुलता एक पुत्र अचानक गेल्याने भिलकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांची आई दोन दिवसांपासून बेशुद्ध आहे. मंगळवारी रामटेकच्या गांधी चौकात लक्ष्मीपूजन ठरले होते. परंतु, दुकानदारांनी साध्या पद्धतीने पूजन करायचे ठरविले. कुणीही आतिषबाजी करणार नाही, फटाके फोडणार नाही, असा निर्णय दुकानदारांनी घेतला.