फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:36 PM2024-04-02T20:36:43+5:302024-04-02T21:36:27+5:30

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते

'Powerstyle' attack on devendra Fadnavis by sharad pawar; Those who say Sharad Pawar's time is over, now... | फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

मुंबई/नागपूर - राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा यापूर्वी सातत्याने सामना झाला आहे. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही २०१९ पर्यंत असेच चित्र होते. मात्र, २०१९ नंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना, भाजपाने थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणातून शरद पवारांनाच लक्ष्य केलं. आता, २०२४ च्या निवडणुकीतही भाजपाकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. त्यावर, आता शरद पवारांनी थेट पलटवार केला. तसेच, फडणवीसांना पवारस्टाईल टोलाही लगावला.  

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते. वर्ध्यातून महाविकास आघाडीच्यावतीने अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, यवतमाळमधून संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांकडून, त्यातही भाजपाकडून शरद पवार यांना लक्ष्य करुन प्रचार केला जात आहे. शरद पवारांचे राजकारण संपलेय, असेही बोलले जाते, यासंदर्भातील प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी पवारस्टाईल उत्तर देत फडणवीसांच्या जुन्या भाषणाची आणि २०१९ मध्ये बदललेल्या समीकरणाची आठवण करुन दिली. 

महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत शरद पवार संपले, असे म्हणत होते. पण, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अशी परिस्थिती होती की, पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले, असे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. 

दरम्यान, २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान, एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी, शरद पवार साहब की राजनिती ईरा खतम हो गया, असे म्हणत शरद पवारांचा राजकीय वठ आता संपल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. अर्थात, शरद पवारांनी त्यावर कुठलंही उत्तर दिलं नाही. मात्र, २०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे, देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. 
 

Web Title: 'Powerstyle' attack on devendra Fadnavis by sharad pawar; Those who say Sharad Pawar's time is over, now...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.