उद्या आपली बससेवा बंद राहणार, निवडणूक कामासाठी ५२५ बसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:21 IST2026-01-13T20:20:39+5:302026-01-13T20:21:30+5:30
Nagpur : मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच साहित्य पोहोचविण्यासाठी ५२५ आपली बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Our bus service will be closed tomorrow, 525 buses for election work
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांपर्यंत निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच साहित्य पोहोचविण्यासाठी ५२५ आपली बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. १४ जानेवारी रोजी शहर बससेवा पूर्णपणे बंद राहील. तर मतदानासाठी १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मर्यादित मार्गावर २५० बस सुरू राहतील. १६ जानेवारीपासून शहर बससेवा आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार पुन्हा नियमित सुरू होईल.
मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले, निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी ५२५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली बसेसचा वापर करण्यात येणार आहे.
तसेच अरुंद गल्ली व दाट वस्तीतील भागांमध्ये पोहोचण्यासाठी २६ लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मतदानप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २६० वाहने झोनल अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. ईव्हीएम मतदान केंद्रांपर्यंत नेणाऱ्या तसेच मतमोजणी केंद्रांपर्यंत आणणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि.१५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, मतमोजणी शुक्रवारी (दि.१६) सकाळी १० वाजता सुरू होईल. दुपारी १२.३० वाजेपासून कल व निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. १४ जानेवारीपासून मतदान साहित्याचे वितरण सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
मतमोजणी कर्मचाऱ्यांना दोनवेळा प्रशिक्षण
मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएमसह दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि मतमोजणी कर्मचाऱ्यांनाही दोनवेळा प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली जात असून, ४८ तासांच्या कालावधीत उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.