कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 09:41 IST2023-03-05T09:40:39+5:302023-03-05T09:41:09+5:30
कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

कसब्यात ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : कसबा येथील विजयाचा विरोधकांकडून खूप उदो उदो केला जात आहे. मात्र, तेथील काँग्रेसचे उमेदवार हे केवळ सहानुभूतीवर निवडून आले आहेत. येथे भाजपची मते कमी झाली नाहीत. ब्राह्मण समाज कधीही देश, देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसब्यामध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, कसब्याची जागा भाजप हरला असला तरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजप जिंकला. त्याच दिवशी तीन राज्यांचा निकाल आला असून, त्यात भाजपचा विजय झाला. विरोधक कितीही एकत्र आले तरी विजय भाजपचाच होणार.
शरद पवारांनी निकाल पाहावे
- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कदाचित देशातील तीन राज्यांचे निकाल पाहिले नसावेत. त्यांनी ते निकाल अगोदर पाहावे.
- संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे.
- राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत प्रवास योजना सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर नियमित प्रवास सुरू होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.