रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा! मुंबईत प्रदेशाध्यक्षांसमोर पदाधिकाऱ्यांनी मांडले समीकरण
By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2023 19:12 IST2023-06-14T19:12:23+5:302023-06-14T19:12:47+5:30
काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही रामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा! मुंबईत प्रदेशाध्यक्षांसमोर पदाधिकाऱ्यांनी मांडले समीकरण
नागपूर : काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेहीरामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. रामटेकची जागा शिवसेनेने जिंकली होती. मात्र, आता खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल दोघेही शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेना विभागल्यामुळे कमजोर झाली आहे. राष्ट्रवादी जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघात लढते. त्यामुळे रामटेक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे केली.
वर्धा, अमरावती, गडचिरोली व नागपूर या चार लोकसभा मतदारसंघांची स्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष बाब गुजर यांनी काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी केली. काँग्रेस लढत असलेल्या चार विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) लोकसभेची उमेदवारी देणे योग्य होणार नाही, अशीही बाजू गुजर यांनी मांडली. बैठकीत माजी आ. प्रकाश गजभिये, राजाभाऊ ताकसांडे व रमेश फुले यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर आपली ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. बैठकीला कार्याध्यक्ष विलास झोडापे, सलील देशमुख, लीलाधर धनविजय, राजाभाऊ आखरे, संतोष नरवडे, अनुप खराडे, बंडोपंत उमरकर, अनिल साठवणे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतही डावलले जाते
विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला काटोल व हिंगणा हे दोनच मतदारसंघ दिले जातात. काँग्रेस उर्विरत चार मतदारसंघात लढते. याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोगावे लागतात. या निवडणुकीतही आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा येतात. असेच सुरू राहिले तर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढणार कशी, अशी नाराजीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.