Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
By कमलेश वानखेडे | Updated: December 29, 2025 12:13 IST2025-12-29T12:10:57+5:302025-12-29T12:13:00+5:30
तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
-कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धवसेनेच्या महाविकास आघाडीवर रविवारी रात्री शिक्कामोर्तब झाले. नेत्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार १५१ पैकी काँग्रेस १२९, राष्ट्रवादी (शरद पवार) ला १२ जागा, तर उद्धवसेनेला १० जागा सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार आहेत. आज (२९ डिसेंबर) अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली जाणार आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या घरी रात्री महाविकास आघाडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आ. प्रकाश गजभिये, शेखर सावरबांधे, उद्धवसेनेचे लोकसभा प्रमुख सतीश हरडे, जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, काँग्रेसचे आ. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, बंटी शेळके, उमाकांत
अग्निहोत्री, अतुल कोटेचा, शेख हुसैन उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रवादीने २४ जागांची मागणी केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ४ जागा द्यावा, असा आग्रह धरला. मात्र, काँग्रेस नेते १० जागांवर सरकायला तयार नव्हते. दोन्हीकडून खूप ताणले गेले. चर्चा थांबते की काय, अशी परिस्थती निर्माण झाली. शेवटी १२ जागांवर तडजोड झाली. तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडून लढतील, असे ठरले.
उद्धवसेनेची ३० जागांची मागणी, १० जागांवर समाधान
दुनेश्वर पेठे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, आम्ही जास्त जागा मागितल्या, पण कार्यकर्त्यासाठी तडजोड करावी लागली. काँग्रेसने १५ जागा सोडण्यास संमती दिली असल्याचा दावा त्यांनी केला. उद्धवसेनेच्या नेत्यांनी देखील सुरुवातीला ३० जागांची मागणी केली. मात्र, काँग्रेसने येथेही १० पेक्षा जास्त जागा देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर विधानसभानिहाय जागांवर चर्चा झाली. शेवटी १० जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली व उद्धवसेनेच्या नेत्यांनी ते मान्य केले.
काँग्रेस अखेरच्या दिवशी देणार 'एबी' फॉर्म
काँग्रेसचे जवळपास २५ टक्के उमेदवार निश्चित झाले आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार नाही, तर अखेरच्या दिवशी मंगळवारी सकाळी उमेदवारांना 'एबी' फॉर्म दिले जातील किंवा थेट झोन कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचविले जाणार असल्याची माहिती प्रदेश स्तरावरील काँग्रेस नेत्याने लोकमतशी बोलताना दिली.