नागपूरला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून वगळले ! अर्थसंकल्पात नागपूर- विदर्भाच्या विकासाला चालना देणारी घोषणा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:25 IST2026-02-02T13:24:26+5:302026-02-02T13:25:58+5:30
Nagpur : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्ये रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी झाल्या असल्या तरी देशाचे मध्यवर्ती केंद्र, प्रमुख रेल्वे जंक्शन आणि महत्त्वाचे मालवाहतुकीचे केंद्र असलेल्या नागपूरला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून वगळण्यात आल्याचे चित्र आहे.

Nagpur excluded from high-speed rail corridor! There is no announcement in the budget to promote the development of Nagpur-Vidarbha
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात मध्ये रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी झाल्या असल्या तरी देशाचे मध्यवर्ती केंद्र, प्रमुख रेल्वे जंक्शन आणि महत्त्वाचे मालवाहतुकीचे केंद्र असलेल्या नागपूरला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून वगळण्यात आल्याचे चित्र आहे.
देशात विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नागपूरचा समावेश होतो. मिहान, लॉजिस्टिक्स हब, संरक्षण उत्पादन, वेअरहाउसिंग आणि औद्योगिक गुंतवणुकीमुळे शहराचे महत्त्व वाढत आहे. असे असतानाही नागपूर-विदर्भाला अर्थसंकल्पात थेट आणि भविष्यातील विकासाला गती देणारी रेल्वे घोषणा करण्यात आलेली नाही, ही बाब चर्चेला आली आहे.
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले सातही हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतातील महानगरांभोवती केंद्रित आहेत. मध्य भारतातील नागपूर, अमरावती किंवा गोंदिया यांसारख्या शहरांचा त्यात समावेश नाही.
नागपूरला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून वगळण्यात आले आहे. अर्थसंकल्पात मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडी या मार्गावर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या यादीत नागपूरचे नाव नसणे, ही बाब नागपूर विदर्भातील जनतेसाठी धक्कादायक ठरली आहे.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली असली, तरी या निधीचा थेट लाभनागपूर-विदर्भाला कितपत मिळणार, हा प्रश्न चर्चेला आला आहे.
"येथून थेट हरिद्वार, रायबरेलीसह अन्य शहरांत ट्रेन सुरू करण्यात याव्या, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. वाढता व्याप बघता नागपूरला रेल्वेचे स्वतंत्र झोन बनविण्यात येईल, ज्येष्ठ नागरिकांना नव्याने सवलती मिळेल, अशी किमान अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पाने सर्वांवरच पाणी फेरले. त्यामुळे हा अर्थसंकल्प रेल्वे प्रवाशांसाठी निराशाजनक आहे."
- बसंतकुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र, नागपूर
