Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:14 IST2025-12-26T09:11:10+5:302025-12-26T09:14:37+5:30
Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न विदर्भात स्वीकारला असला, तरी दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे.

Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
Municipal Corporation Election Mahayuti: विदर्भातील चार महापालिकांसाठी भाजपने महायुतीसंदर्भातील घेतला आहे. चार महापालिकांमध्ये भाजप-शिंदेसेना एकत्र लढणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) दोन महापालिकांमध्येच सोबत असणार आहे. अमरावतीमध्ये भाजप-शिवसेना आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महापालिकांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने दोन ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेण्याचा, तर दोन ठिकाणी न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
कोणत्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) असणार सोबत?
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुती एकत्र लढणार की नाही, याबद्दल विदर्भातील चार महापालिकांमध्ये संभ्रम होता. अखेर तो निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर आणि अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीत असणार आहे. तर नागपूर, अमरावतीमध्ये भाजपा-शिंदेसेना युतीत लढणार आहेत. नागपूर आणि अमरावतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमरावतीमध्ये भाजपा-शिंदेसेना-युवा स्वाभिमानी पक्ष
अमरावती महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेसोबत आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष असे तिघे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. शिंदेसेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
चारही महापालिकांमध्ये एकत्र लढणार
याबद्दल बोलताना शिंदेसेनेचे नेते उदय सामंत म्हणाले की, 'चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. त्या बैठकीसाठी आलो होतो. चारही महापालिकांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या चारही महापालिकांमध्ये शिवसेनेचा मानसन्मान ठेवला जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे चारही महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत.'
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'चारही महापालिकांमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीचा निर्णय झाला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल. अकोलामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत येण्याचे संकेत आहेत आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्ष सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत येऊ शकते", अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.