काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
By कमलेश वानखेडे | Updated: December 26, 2025 14:49 IST2025-12-26T14:43:33+5:302025-12-26T14:49:45+5:30
Nagpur Municiapal ELection: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे.

काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
- कमलेश वानखेडे, नागपूर
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने नागपुरातील सव्वाशेहून अधिक जागांसाठी उमेदवारांचे तिकीट फायनल केले आहे. गुरुवारी मुंबईत प्रदेश निवड समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये बहुतांश उमेदवारांची नावे झाली असल्याची माहिती शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिली.
टिळक भवनात झालेल्या या बैठकीत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, चंद्रकांत हंडोरे यांच्यासह नागपूर प्रभारी रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा उपस्थित होते.
बैठकीच्या पूर्वी बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री मुंबईत आमदार विकास यांनी ठाकरे नागपुरातील विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवारांशी विधानसभानिहाय चर्चा करून उमेदवारांची नावे निश्चित केली. सुमारे ९० टक्के जागांवर एकाच उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले.
आमदार विकास ठाकरे यांनी प्रदेशच्या बैठकीत सर्व उमेदवार सहमतीने निश्चत करण्यात आल्याची माहिती दिली. निरीक्षक रणजित कांबळे यांनी त्याला दुजोरा दिला. फक्त १५ मिनिटात नागपूरच्या जागा वाटपाची चर्चा आटोपली. महापालिका निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता पहिल्यांदाच एवढ्या सहजपणे प्रदेश निवड मंडळात नागपूरचा विषय मार्गी लागला, हे विशेष.
राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेनेशी २७ ला अंतिम चर्चा
एकीकडे काँग्रेसने सव्वाशेहून अधिक जागांसाठी एकाच उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेनेशी आघाडी करायची झाली तर कसे करायचे, असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी उपस्थित केला.
यावर दोन्ही पक्षांशी दोनदा चर्चा झाली असून २७ ला पक्षांशी अंतिम चर्चा केली जाईल. दोन्ही पक्ष कोणत्या जागा मागतात ते पाहून संबंधित विधानसभेतील उमेदवाराला विश्वासात घेऊनच जागा सोडायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आमदार विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उत्तर नागपूरवर चर्चा
माजी मंत्री नितीन राऊत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत पोहोचले नाहीत. त्यामुळे उत्तर नागपुरातील जागांवर शुक्रवारी दुपारी चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला जाईल.
पता की पत्नी ? काही जागा अडल्या
पतीला तिकीट द्यायची की पत्नीला, या मुद्यावर सुमारे १० ते १५ जागा अडल्या आहेत. जेथे महिला उमेदवार देऊन दुसरा पुरुष कार्यकर्ताही समाधानी करात येऊ शकतो, अशा जागांवर तसाच निर्णय घेण्याचा विचार आहे.
सामाजिक आरक्षणाचा फटका बसला असला तरी समन्वयातून जर दोघांनाही उमेदवारी देता येत असेल तर तसा मार्ग काढला जाणार आहे.