बेजबाबदार निवडणूक आयुक्तांमुळे नागपुरात मतदार यादीचा घोळ आमदार खोपडेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:08 IST2026-01-15T23:06:38+5:302026-01-15T23:08:45+5:30
मनपा निवडणुकीत मताची टक्केवारी घसरणे, मतदार याद्यांमधीळ घोळ, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळे बूथ व बाहेरील प्रभागात समाविष्ट करणे असे प्रकार झाले.

बेजबाबदार निवडणूक आयुक्तांमुळे नागपुरात मतदार यादीचा घोळ आमदार खोपडेंचे टीकास्त्र
योगेश पांडे - नागपूर
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकीत झालेल्या कमी मतदानामुळे राजकारण तापू लागले आहे. पुर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी थेट निवडणूक आयुक्तांवरच टीका केली आहे. बेजबाबदार आयुक्तांमुळेच मतदार यादीचा घोळ झाला असून इतके कमी मतदान होणे ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका खोपडे यांनी केली आहे.
मनपा निवडणुकीत मताची टक्केवारी घसरणे, मतदार याद्यांमधीळ घोळ, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळे बूथ व बाहेरील प्रभागात समाविष्ट करणे असे प्रकार झाले. निवडणूक आयुक्तांनी मतदार यादीवर घेतलेले आक्षेप फेटाळण्यात आले. त्यामुळे मतदार यादीत घोळ झाला व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. मतदान केंद्राच्या आत बसलेले सरकारी अधिकाऱ्यांकडील मतदार यादी व केंद्राच्या बाहेरील याद्यांमध्ये तफावत होती. या घोळात अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले.
या निवडणुकीत मतदारांची मोठी गैरसोय झाली. मतदार यादी अपडेट न झाल्यामुळे मताची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या घोळाला निवडणूक आयुक्त पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप खोपडे यांनी लावला.