आमदार देशमुखांचा 'नो हेल्मेट स्टंट' भोवला! पोलिसांनी ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:28 IST2025-08-16T14:26:54+5:302025-08-16T14:28:13+5:30

सावनेरचे आमदार हेल्मेटशिवाय स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद : सोशल मीडियावर संतापाचा सूर

MLA Deshmukh's 'no helmet stunt' goes viral! Police fines him | आमदार देशमुखांचा 'नो हेल्मेट स्टंट' भोवला! पोलिसांनी ठोठावला दंड

MLA Deshmukh's 'no helmet stunt' goes viral! – Police fines him

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांना 'हर घर तिरंगा' मोहिमेदरम्यान विना हेल्मेट मोटारसायकल चालवत स्टंट करणे भोवले आहे. नियमांचा भंग केल्याबद्दल मोटर वाहन कायद्यान्वये पोलिसांनी कारवाई करून दंड आकारला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने देशमुख यांनी स्वतःच्या कृतीतून जनतेला नियम पाळण्याची शिकवण देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी बेजबाबदार कृत्य केल्याने सोशल माध्यमांवर अनेक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.


१३ ऑगस्ट रोजी सावनेरमध्ये 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अतिउत्साहात देशमुख यांनी अग्निशमन दलाची मोटारसायकल विना हेल्मेट चालविली. ही बाइक रॅली सावनेर नगरीतील मुख्य रस्त्याने चौकाचौकांत फिरली. या रॅलीत बाइकसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांच्या गाडीवर अग्निशमन दलाचे अधिकारी निखिलेश वाडेकर हे बसले होते. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर खूप व्हायरल झाला.


अनेकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सावनेरमध्ये पोलिसांनी देशमुख यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत दंड आकारला. यासंदर्भात सावनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा साहाय्यक पोलिस अधीक्षक सागर खर्डे यांना विचारणा केली असता त्यांनी दुजोरा दिला. या प्रकरणात दीड ते दोन हजार दंड आकारण्यात आला इतकीच माहिती त्यांनी दिली. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनीही यावर भाष्य करण्याचे टाळले. या रॅलीत अनेक कार्यकर्ते विना हेल्मेट बाइक चालवत होते. त्यांच्यावरदेखील कारवाई झाली का याची माहिती समोर आलेली नाही. 


 

Web Title: MLA Deshmukh's 'no helmet stunt' goes viral! Police fines him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.