अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस
By योगेश पांडे | Updated: November 19, 2024 22:01 IST2024-11-19T22:00:11+5:302024-11-19T22:01:47+5:30
पराभव दिसून लागल्यानेच महाविकासआघाडीकडून विनोद तावडेंवर आरोप व हल्ला

अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या बचावासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले आहेत. महाविकासआघाडीला पराभव स्पष्टपणे दिसत असल्याने खोटे आरोप करत कव्हर फायरिंगचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी लावला. नागपुरात मंगळवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जेव्हा निवडणुकीत पराभव दिसू लागतो त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातीलच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ कुठलाही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नाही. त्यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. नालासोपारा येथील उमेदवार राजन नाईक यांच्यावरदेखील हल्ला झाला. महाविकास आघाडीच्या यंत्रणेनी पराभव पाहता कव्हर फायरिंग केले आहे, असा आरोप फडणवीस यांनी लावला.
अनिल देशमुख यांनी सातत्याने सलिम जावेद यांच्या कथांप्रमाणे तथ्यहिन बाबींवर प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अगोदर त्यांनी अशाच प्रकारे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाची पोलखोल झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यातून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. साडेसात किलो दगड मारल्यावरदेखील काच फुटली नाही, बोनेटला स्क्रॅच का आली नाही. एक दगड मागच्या काचेतून आला तर तो अनिल देशमुखांच्या कपाळावर समोरून कसा लागला. अशा प्रकारे केवळ रजनीकांतच्या चित्रपटात दगड फिरू शकतो. देशमुख यांच्याकडून पराभव दिसून लागल्याने भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनीदेखील त्याचे समर्थन केले ही दुर्दैवी बाब आहे. पोलीस सखोल चौकशी करतील व नेमके तथ्य समोर येईल, असे फडणवीस म्हणाले.