स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:09 IST2025-11-20T16:08:51+5:302025-11-20T16:09:57+5:30
Nagpur : १९८४ मध्ये केरळ येथे 'ईव्हीएम'द्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्यात आली होती. नियमात ईव्हीएम वापरण्याची तरतूद नव्हती.

Is it legal to use EVMs in local body elections?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम'चा उपयोग करणे वैध आहे का? अशी विचारणा नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला करून यावर गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम' सोबत 'व्हीव्हीपॅट'चा उपयोग व्हावा किंवा हे अशक्य असल्यास बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली.
गुडधे यांचे वकील वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा यांनी राज्य निवडणूक आयोग मनमानी व निराधारपणे वागत असल्याचा आरोप केला. आयोगाने मंगळवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'ईव्हीएम' सोबत 'व्हीव्हीपॅट'चा उपयोग करण्याची कायद्यात तरतूद नाही, अशी माहिती दिली होती. तसेच, या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरल्यास कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका मांडली होती.
केरळमधील निवडणुकीचे दिले उदाहरण
१९८४ मध्ये केरळ येथे 'ईव्हीएम'द्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेण्यात आली होती. नियमात ईव्हीएम वापरण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यास सांगितले होते, अशी माहितीही अॅड. मिर्झा यांनी न्यायालयाला दिली.
युक्तिवाद काय ?
अॅड. मिर्झा यांनी कायद्यातील तरतुदी व निवडणूक नियमांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांमध्ये ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची तरतूद आहे. परंतु, निवडणूक नियम केवळ बॅलेट पेपर वापरण्याची परवानगी देतात.
ईव्हीएम वापरण्यासंदर्भात एकही नियम नाही. असे असताना निवडणूक आयोग 'ईव्हीएम'द्वारे निवडणूक घेत आहे. ही कृती अवैध आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 'ईव्हीएम' वापरण्याची वैधता सिद्ध करण्यास सांगितले.