नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:51 IST2026-01-02T12:48:29+5:302026-01-02T12:51:41+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूरमध्ये राजकीय नाट्य बघायला मिळाले. भाजपाचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊन नये म्हणून समर्थकांनी घरात कोंडले.

नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महापालिकेत भाजपाचे पदाधिकारी किसन गावंडे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. मात्र, गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून आता समर्थकांनीच त्यांना घरात कोंडले. पाया पडतो, मला अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ द्या, अशी विनवणी गावंडे यांनी समर्थकांना केली. मात्र, समर्थकांनी भाजपावर टीका करत कुलूप उघडण्यास नकार दिला.
नागपूर महापालिकेच्या प्रभाग १३-ड मधून किसन गावंडे यांनी बंडखोरी करत उमेदवार अर्ज भरला. भाजपाकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. गावंडे हे अर्ज मागे घेणार असल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना घरात डांबले आणि कुलूप लावली. त्यामुळे मोठे राजकीय नाट्य रंगले.
पाया पडतो, पक्षाचा आदेश पाळावाच लागेल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी गावंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला घरात कोंडले आणि कुलूप लावले. अर्ज मागे घ्यायचा नाही, अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
"कार्यकर्त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. मला पक्ष आदेश पाळावाच लागेल. मी कार्यकर्त्यांना पाया पडून विनंती करतो. मला पक्षशिस्तीचे पालन करावेच लागेल", असे आवाहन गावंडे यांनी केले. मात्र, कार्यकर्त्यांनी तरीही कुलूप उघडलेच नाही. नंतर पक्षाचे नेते परिणय फुके हे त्यांच्या घरी आले. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावले आणि त्यानंतर घराचे कुलूप उघडण्यात आले.
गावंडेंचे समर्थक कशामुळे नाराज झाले?
प्रभाग १३ ड मधून किसन गावंडे हे भाजपाचे संभाव्य उमेदवार होते. किसन गावंडे आणि विजय होले यांच्या नावे एबी फॉर्म दिले होते. शेवटच्या क्षणी पक्षाने किसन गावंडे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे कार्यकर्ते भडकले. 'आज आम्ही त्यांना घराबाहेर पडू देणार नाही. मग आधीच पक्षाने एबी फॉर्म का दिला? असा प्रश्न विचारत कार्यकर्त्यांनी कुलूप लावले होते.