तिकिटासाठी होर्डिंगबाजी महागात पडणार ! एफआयआर नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना येते अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:50 IST2025-11-13T16:19:52+5:302025-11-13T16:50:16+5:30
Nagpur : आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे.

Hoarding for tickets will be expensive! If an FIR is registered, there will be difficulties in filing nominations
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आरक्षण जाहीर होताच महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी सर्व पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. नेते, आमदार आणि शुभेच्छुकांच्या छायाचित्रांनी सजलेल्या अवैध होर्डिंग्जची शहरात भरमार सुरू झाली आहे. मात्र, फक्त होर्डिंगबाजीच्या जोरावर तिकीट पक्के करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना महागात पडू शकते.
मनपा प्रशासनाने अवैध होर्डिंग्जविरुद्ध कारवाईसाठी झोनस्तरीय पथके तयार केली आहेत. इतकेच नव्हे तर उमेदवारी अर्ज दाखल करताना 'नो ड्यूज सर्टिफिकेट' घेताना होर्डिंग्ज संदर्भातील कारवाईची माहितीही तपासली जाणार आहे. कोणावर दंड ठोठावला असेल, तर दंडाची रक्कम भरावी लागेल. तसेच, कोणत्याही इच्छुकाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यास अशा उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, अवैध होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी झोननिहाय पथके तयार केलेली आहेत. मनपा निवडणुकीच्या काळात अवैध होर्डिंग्जचा पूर येतो. त्यामुळे यंदा कडक कारवाईची तयारी करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीवर दंड ठोठावल्यानंतरही तो वारंवार होर्डिंग्ज लावत असेल, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. गुन्हा नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना अडचण निर्माण होऊ शकते.
रात्रीच्या वेळी लावले जातात होर्डिंग्ज
एखाद्या नेत्याचा वाढदिवस किंवा आगमन असल्यास रात्रीच्या वेळी चौकात अवैधपणे होर्डिंग्ज लावले जातात. अनेकदा ती सिग्नललाच झाकून टाकतात. मध्य नागपुरात काही नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या कडेला कटआउट उभे केले जातात.
त्यांना हटविण्याची कारवाई सुरू होताच होडिंगबाज आमदारांचा धाक दाखवतात. उत्तर आणि दक्षिण नागपुरातील रिंगरोडवरही ठिकठिकाणी अवैध होडिंग्ज दिसतात.
चौक, फुटपाथ झाले विद्रूप
गणेशोत्सव, जन्माष्टमी, दिवाळीनंतर आता नववर्षाच्या शुभेच्छांचे होर्डिंग्ज लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीचर नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गल्ल्या, मोहल्ले, चौक, फुटपाथ याबर अवैध पद्धतीने होर्डिंग्ज लायली जात आहेत. सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर सर्वत्र ती दिसतात. आतील वस्त्यांवरही या होर्डिंग्जची भरमार आहे. मनपाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.