मतदार यादीत 'झोल', प्रशासनाचे दावे 'फोल' ! मतदान टक्केवारीवर होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:42 IST2026-01-13T19:39:35+5:302026-01-13T19:42:11+5:30
Nagpur : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली असताना मतदारांना मात्र आपले नाव मतदार यादीत शोधताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

'Gap' in voter list, administration's claims 'false'! Will it affect the voting percentage?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली असताना मतदारांना मात्र आपले नाव मतदार यादीत शोधताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या संकेतस्थळावर मतदान केंद्राचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता प्रत्यक्षात अडचणी येत आहेत. प्रशासनाने सुविधा उपलब्ध केल्याचा दावा फोल असल्याचा आरोप मतदार करत आहेत.
मोबाईलवर महापालिकेचे संकेतस्थळ उघडत नसल्याने मतदारांना मतदान केंद्राची माहिती मिळत नाही. 'वोट पथ' व मतदार शोध सुविधा पुढे सरकत नसून वारंवार बंद पडत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दुसरीकडे मतदानाला दोन दिवस शिल्लक असतानाही अद्याप घरोघरी व्होटर स्लिप पोहोचलेल्या नाहीत. झोन स्तरावर यासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त केले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे यादीत आपले नाव आहे की नाही याबाबत मतदार साशंक आहेत. ज्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले होते, अशा मतदारांची नावे शोधतानाही अडचणी येत आहेत.
घराजवळचे न देता लांब अंतरावरचे केंद्र
मतदारांना घरापासून नजीक असलेले मतदान केंद्र मिळणे अपेक्षित आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे, घराजवळच्या मतदान केंद्रावर नाव नसून लांब अंतरावरील केंद्रावर नाव टाकण्यात आल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे मतदान करताना वृद्ध, महिला व कामगार वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. आता यात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याने याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार आहे.
मनपाने विकसित केला डिजिटल प्लॅटफॉर्म
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, यासाठी मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने नवे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केले आहे. मतदारांना आता मतदान केंद्र मनपाच्या संकेतस्थळासोबत मनपाचे चॅटबॉट, एआय मित्र व माय नागपूर अॅपवर तात्काळ शोधता येणार आहे. यासंदर्भात या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनपाने आपले मतदान केंद्र ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. यात मतदारांना मतदार ओळखपत्रावर असलेले नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक (ईपीआयसी) नुसार शोधता येणार आहे. मतदारांनी ईपिक क्रमांकानुसार मतदान केंद्र शोधल्यास अधिक अचूक व तात्काळ माहिती मिळू शकेल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.