प्रियकराने घेतली प्रेयसीच्या सरणावर उडी; नैराश्यामध्ये प्रेयसीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST2025-06-10T17:49:16+5:302025-06-10T17:49:58+5:30

Nagpur : कन्हान नदीच्या शांतीघाटावरील थरार

Boyfriend jumps on girlfriend's deathbed; girlfriend commits suicide in depression | प्रियकराने घेतली प्रेयसीच्या सरणावर उडी; नैराश्यामध्ये प्रेयसीची आत्महत्या

Boyfriend jumps on girlfriend's deathbed; girlfriend commits suicide in depression

लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी/कन्हान :
 निराश प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या पार्थिवावर कामठी शहरालगतच्या कन्हान नदीतील शांतीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पार्थिव जळत असताना प्रियकराने दारूच्या नशेत सरणावर उडी मारत स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला लगेच पकडले आणि चांगला चोप दिला. यात तो जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.


अंशिका नितीन खोब्रागडे (१९, रा. हनुमाननगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे मृत प्रेयसीचे तर अनुराग राजेंद्र मेश्राम (२७, रा. हनुमाननगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दोघेही एकाच भागात राहणारे असल्याने त्यांची आपसात ओळख होती. पुढे या ओळखीचे रूपांतर त्यांच्या प्रेमसंबंधात झाले. कुठल्या तरी कारणाने तिला नैराश्य आले आणि तिने रविवारी (दि. ८) सायंकाळी घरातील खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लाऊन घेतला.


कुटुंबीयांनी तिला खाली उतरवून लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पार्थिव पोस्टमार्टमसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.


कारवाई करण्याची मागणी
सहायक पोलिस उपायुक्त विशाल शिरसागर व कामठी (नवीन) चे ठाणेदार महेश आंधळे यांनी जखमी अनुराग व घटनास्थळाची पाहणी केली. त्याला अंशिकाच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा आरोप वडील राजेंद्र मेश्राम यांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनुराग शुद्धीवर आल्यानंतर त्यांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेदार महेश आंधळे यांनी दिली.


कुटुंबीयांनी नेले हॉस्पिटलमध्ये
या मारहाणीत अनुराग मेश्राम नदीच्या पात्रात बेशुद्ध पडला होता. या प्रकाराची माहिती नागरिकांनी त्याच्या वडिलांना दिली. वडील राजेंद्र व भाऊ पवन यांनी कन्हान पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत तो तिथेच पडून होता. त्यांनी अनुरागला कामठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तो दारू प्यायला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Boyfriend jumps on girlfriend's deathbed; girlfriend commits suicide in depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.