बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 22:17 IST2026-01-08T22:01:37+5:302026-01-08T22:17:53+5:30
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकीटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत निवडणूकांचा अर्ज दाखल केला

बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
योगेश पांडे
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी भाजपाने चांगलीच गंभीरतेने घेतली आहे. बंडखोरांसोबतच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ३२ जणांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून उमेदवारांविरोधात छुपा प्रचार करणाऱ्या काही माजी नगरसेवकांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे.
२०१७ साली भाजपने अशाच पद्धतीने ६५ जणांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकीटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत निवडणूकांचा अर्ज दाखल केला. पक्षनेत्यांच्या विनंतीनंतरदेखील त्यांनी माघार घेतली नाही. त्यात विनायक डेहनकर, माजी नगरसेवक सुनिल अग्रवाल, धीरज चव्हाण इत्यादींचा समावेश होता. पक्ष कार्यकारिणीने ही एकूण बाबच गंभीरतेने घेतली. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ३२ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली. पक्षशिस्त सर्वांना सारखी आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांना पक्षात कुठलीही जागा नाही. तिकीट मिळाले नाही, म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलणे अयोग्यच आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही
काही माजी नगरसेवकांनी तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या उमेदवारांविरोधातच छुपी मोहीम उघडली आहे. ‘लोकमत’ने ही बाब समोर आणल्यावर भाजपने हा मुद्दादेखील गंभीरतेने घेतला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा आदेश अंतिम असतो. जो कोणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम करणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात छुपी खेळी करेल,त्याची गय केली जाणार नाही., असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
या ३२ जणांविरोधात कारवाई
(प्रभाग १) सुनिता महल्ले, (प्रभाग २) देवराज वासनिक, (प्रभाग ३) नसिमाबानो, (प्रभाग ४) सचिन खोब्रागडे-सुरेश टेंभरे, (प्रभाग ५): महेन्द्र गुप्ता-पुष्पा किरपाने, (प्रभाग ९): रुणाल चौहान, (प्रभाग १४): सुनील अग्रवाल, (प्रभाग १७): विनायक डेहनकर, (प्रभाग १८): धीरज चव्हाण व अक्षय ठवकर, (प्रभाग १९): प्रकाश घाटे-पापा यादव, (प्रभाग २०): विशाल लारोकर, (प्रभाग २१): शुभम मौदेकर, सुलोचना कोवे,राकेश भनारकर, (प्रभाग २२): रविशंकर कुंभारे, दशरथ मस्के, आशिष भुते, नंदिनी भुते, (प्रभाग २४): टेकचंद सोनबोईर, नंदु अहिर, रेणु गेंडरे, शुभम पडोळे,राजु घोसे, (प्रभाग २६): सुनील मानापुरे, (प्रभाग ३१): सोनाली घोडमारे, (प्रभाग ३२): दिपक चौधरी, (प्रभाग ३४): आसावरी कोठीवान-सुनील मानेकर.