"तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:30 IST2026-01-06T13:17:47+5:302026-01-06T13:30:42+5:30
आशिष शेलार यांनी तुम्हाला सावरकर मान्य करावेच लागतील असा इशारा अजित पवारांना दिला आहे.

"तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील"; आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावले
Ashish Shelar on Ajit Pawar: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्षांमधील कलह आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध सुरू असून, भाजप नेते आशिष शेलार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून अजित पवारांना कडक शब्दांत सुनावले आहे. सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ, अशा शब्दांत शेलारांनी अजित पवारांना ठणकावले आहे.
या वादाची सुरुवात अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून झाली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी भाजपच्या काही धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर बोचरी टीका केली होती. पुण्याच्या विकासकामांच्या श्रेयवादावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. अजित पवारांच्या या टीकेला आधी रवींद्र चव्हाण आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता आशिष शेलार यांनी या वादात थेट सावरकरांचा मुद्दा आणल्याने युतीमधील तणाव वाढला आहे.
आशिष शेलार यांचा आक्रमक पवित्रा
अजित पवारांच्या टीकेवर भाष्य करताना आशिष शेलार यांनी आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे, असं म्हटलं. "रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर न याल तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करु," असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
पुण्यातून संघर्षाला सुरुवात
अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर भाजपने यापूर्वी पुण्याची सत्ता तुमच्याकडे होती अशी आठवण करून दिली. निवडणुका अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, मित्रपक्षांमधील हा अंतर्गत संघर्ष विरोधकांसाठी फायद्याचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार आता शेलारांच्या या अल्टिमेटमवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.