दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी, घरी सोडण्यासाठी काही सुविधा आहे का? हायकोर्टाने मनपाला मागितली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:53 IST2026-01-13T19:52:23+5:302026-01-13T19:53:47+5:30
Nagpur : दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मतदान केंद्रापासून घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का?

Are there any facilities to take the differently-abled to the polling station and drop them off at home? High Court seeks information from the Municipal Corporation
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मतदान केंद्रापासून घरी सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिका आयुक्तांना केली व यावर मंगळवारी (दि. १३) माहिती सादर करण्यास सांगितले.
यासंदर्भात जयप्रकाशनगर येथील रहिवासी प्रकाश अंधारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. नागपूरला १५० पीएम ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी ३० ई-बसेस गेल्या डिसेंबरमध्ये मिळाल्या आहेत. या बसेसमध्ये हायड्रॉलिक लिफ्टची सुविधा आहे.
त्यामुळे दिव्यांगांना या लिफ्टद्वारे सहजपणे बसमध्ये बसता व उतरता येते; परंतु चालक आणि वाहकांना आवश्यक प्रशिक्षण नसल्याच्या कारणामुळे पीएम ई-बस सेवा सुरू करण्यात आली नाही. आगामी मनपा निवडणुकीपर्यंत ही बससेवा सुरू झाल्यास दिव्यांग मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान केंद्रापर्यंत जाता येईल व मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मनपाने मात्र ही बस सेवा निवडणुकीपर्यंत सुरू होऊ शकत नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने संबंधित माहिती मागितली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सेजल लखानी तर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.