Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 00:09 IST2025-12-31T00:07:38+5:302025-12-31T00:09:58+5:30
Nagpur Municipal Corporation: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान एबी फॉर्म मिळालेल्या शिंदेसेनेच्या उमेदवारांने काळजावर दगड ठेवून निवडणूक कार्यालय गाठले.

Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
नागपूर: जन्मदात्याचा मृत्यू, घरात शोककळा आणि त्याच वेळी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची अंतिम वेळ... अतिशय कठीण प्रसंग असताना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळण्याची आशाच त्यांनी सोडली होती. मात्र मातेच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच पक्षनेत्यांनी त्यांच्या हातात एबी फॉर्म दिला व मुलाचे कर्तव्य पार पाडल्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी नामनिर्देशनपत्र भरायला गेले. शिंदेसेनेचे प्रभाग पाचचे उमेदवार योगेश गोन्नाडे यांच्यासाठी हा अतिशय भावनिक क्षण ठरला.
१० वर्षे नगरसेवक राहिलेले व सोमलवार शाळेचे माजी मुख्याध्यापक योगेश गोन्नाडे यांनी निवडणुकीत उभे राहण्याची तयारी केली होती. मात्र यांच्या आई वत्सलाबाई गोन्नाडे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्या स्थितीतदेखील केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी ते सोमलवार रामदासपेठ शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला रविवारी उपस्थित राहिले होते. सोमवारी त्यांच्या आईचे निधन झाले. मंगळवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती व त्यांना ‘एबी’ फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आशा सोडली होती.
मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होत असताना शिंदेसेनेचे नेते तेथे ‘एबी’ फॉर्म घेऊन पोहोचले. नेत्यांची ही भूमिका पाहून गोन्नाडे व त्यांचे कुटुंबीय भावुक झाले होते. अंत्यसंस्कार आटोपल्यावर वेळेची मर्यादा संपण्यास काही मिनिटेच शिल्लक असताना गोन्नाडे थेट सतरंजीपुरा झोन कार्यालयात पोहोचले. दुपारी तीन वाजण्याच्या अगदी काही मिनिटे आधी त्यांनी प्रभाग क्रमांक पाचमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आईच्या जाण्याचे दु:ख मनात असले तरी कठीण काळात पक्षाने साथ दिल्याचे समाधान आहे. कुटुंबात कठीण प्रसंग असताना मला मिळालेली उमेदवारी हा दिवंगत आईचा आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची मुलगी कृतिका हिलादेखील प्रभाग ८ मधून शिंदेसेनेची उमेदवारी मिळाली आहे.