काटोलमध्ये महाविकास आघाडीत तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:11 IST2024-10-26T18:10:02+5:302024-10-26T18:11:45+5:30
Nagpur : याज्ञवल्क्य जिचकार, प्रमोद घरडे, विलास झोडापे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

A Rebellion from Umred in Maha Union and from katol in Maha Vikas Aghadi
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल/उमरेड : महायुती आणि महाविकास आघाडीचे नागपूर ग्रामीणच्या सहाही मतदारसंघातील पूर्ण उमेदवार निश्चित झालेले नाही. मात्र काटोल आणि उमरेड मतदारसंघात या दोन्ही आघाड्यात नाराजांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. काटोलमध्ये माजी मंत्री आ. अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटत युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस याज्ञवल्क्य जिचकार यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. इकडे उमरेडमध्ये भाजपमधून इच्छुक असलेले प्रमोद घरडे आणि त्यांच्या पत्नी रूपाली घरडे या दाम्पत्याने उमेदवारी अर्ज दाखल करीत राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला.
दोघांनीही भाजपा आणि अपक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विलास झोडापे यांनी सुद्धा अपक्ष अर्ज सादर केला. त्यामुळे उमरेडमध्ये महायुतीतही बंडखोरी होण्याचे संकेत आहे. काटोलमध्ये जिचकार यांनी समर्थकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती येथून रॅली काढत तहसील कार्यालयात दाखल झाले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष चिवंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत त्यांच्या आई राजश्री श्रीकांत जिचकार, मैत्री जिचकार, सुरेंद्र जिचकार आदी उपस्थित होते.