Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत लढत
By यदू जोशी | Updated: February 23, 2026 11:42 IST2026-02-23T11:41:00+5:302026-02-23T11:42:02+5:30
Rajya Sabha Elections 2026: मविआतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक २० जागा आहेत उद्धवसेनेकडे. या जागेवर आमचाच दावा आहे असे उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे.

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत लढत
-यदु जोशी, मुंबई
राज्यसभेच्या सात जागांची १६ मार्च रोजी निवडणूक होत असून विधानसभा सदस्यांच्या संख्येचा विचार केला तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल, असे चित्र असताना या तिन्ही पक्षांनी सदर जागेवर दावा केल्याने त्यांच्यात एकमत होणे कठीण जाईल, असे आजतरी दिसत आहे.
मविआतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक २० जागा आहेत उद्धवसेनेकडे. या जागेवर आमचाच दावा आहे असे उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी कविधान केले होते की शरद पवार यांच्याशी माझी चर्चा झाली असून पवार राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची भावना त्यांनीच आपल्याकडे व्यक्त केलेली आहे.
मात्र, राऊत यांनी आता अशी पुस्ती जोडली आहे की आमचे नेते उद्धव ठाकरे देतील त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू, मविआतील घटक पक्षांशी चर्चा करूनच निर्णय होईल. त्यामुळे या एका जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिन्ही पक्ष दावेदार, कोणाला कोणती जागा हवीये?
उद्धव ठाकरे यांनी यावेळीदेखील विधान परिषदेवर जावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीने संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकमतला सांगितले की, राज्यसभेवर जाण्याची संधी काँग्रेसला मिळायला हवी असा मतप्रवाह पक्षात आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे (शरद पवार) यांनी लोकमतला सांगितले की, शरद पवार यांच्यासारखे नेते राज्यसभेत पाहिजेत, ही भावना आहे. विधानसभेच्या सदस्यांद्वारे सात खासदार राज्यसभेवर पाठविले जातील. एक जागा जिंकायची तर ३७ मतांचा कोटा असेल. उद्धवसेनेचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे १० विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे मविआची एक जागा निवडून येईल. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून केवळ एकच जागा मविआच्या वाट्याला जाईल अशी स्थिती आहे. उद्धवसेनेचा आग्रह हा उद्धव ठाकरेंसाठी असेल असे मानले जाते.