मालाडमध्ये मेट्रो पुलाखाली बसला भीषण आग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:03 IST2026-01-20T11:01:52+5:302026-01-20T11:03:16+5:30
Mumbai Bus Fire Malad Under Metro Bridge: मुंबईतील मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजजवळ मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली बसला आग लागली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी आणि हाय व्होल्टेज ड्रामा.

मालाडमध्ये मेट्रो पुलाखाली बसला भीषण आग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत
मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात, मेट्रो लाईन ७ (रेड लाईन) च्या पुलाखाली धावत्या बसला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, धुराचे लोट थेट मेट्रो पुलाच्या वरपर्यंत जाच होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मालाडच्या दिशेने जात असताना इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. ही घटना मेट्रोच्या उन्नत पुलाखालीच घडल्याने आग पुलाला लागण्याची भीती निर्माण झाली होती. आगीची माहिती मिळताच बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
वाहतुकीचा खोळंबा आणि मेट्रोवर परिणाम
या आगीमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने या भागातून धावणारी मेट्रो थांबविण्यात आली आहे. आगीचे लोळ मेट्रो रुळांच्या अगदी जवळ पोहोचल्याने मेट्रोच्या रेड लाईनवरील सेवेवरही काही काळ परिणाम झाला.
अग्निशमन दलाची धाव
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.