"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:03 IST2026-02-14T19:01:59+5:302026-02-14T19:03:13+5:30
Mulund Metro Accident: मुलुंडमध्ये मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असून शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. खांबाचा स्लॅब कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला.

"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या
Mumbai mulund metro Accident: मुंबई पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मेट्रो मार्गिकेच्या खांबाचा स्लॅब कोसळला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेवर काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. "विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको", असे म्हणत खासदार गायकवाड यांनी काही मागण्या केल्या आहेत.
मुलुंड येथे घडलेल्या अपघाताबद्दल वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत."
'फक्त इन्फ्रा मॅन म्हणून पीआर करायचा, पण...'
"सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय? मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती?", असे प्रश्न खासदार गायकवाड यांनी सरकारला केले आहेत.
"मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का?
जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त 'चौकशी'चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार? विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 14, 2026
आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही… pic.twitter.com/XZ5JWaV20v
'एमएमआरडीए'कडून उच्चस्तरीय चौकशी
मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेची दखल घेत एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रामधन यादव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहे आणि सरपंच आहेत. एका लग्नासाठी ते मुंबईत आले होते. लग्नासाठी जात असतानाच ही घटना घडली. जखमींपैकी एकाचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.