आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 22:07 IST2026-02-17T22:04:46+5:302026-02-17T22:07:25+5:30
BJP Tejasvi Ghosalkar Welcomed PM Narendra Modi: या संधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आभार मानले.

आधी निवडणुकीत बाजी अन् आता PM मोदींच्या स्वागताची संधी; नगसेविका तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या…
BJP Tejasvi Ghosalkar Welcomed PM Narendra Modi: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही नेते मुंबईत होते. या दोन्ही नेत्यांनी दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला. संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश करत मुंबई मनपाची निवडणूक जिंकणाऱ्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. याबाबत तेजस्वी घोसाळकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
ज्यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वागताची सुवर्णसंधी मला लाभली. ही माझ्यासाठी केवळ औपचारिक भेट नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी प्रेरणादायी ऊर्जा आहे, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी अत्यंत आदर, आत्मीयता आणि अभिमानाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत जाणवलेली ऊर्जा, राष्ट्रासाठी झटणाऱ्या नेतृत्वाची जिद्द आणि विकासासाठीची बांधिलकी हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. या संधीसाठी महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! दहिसरच्या मायबाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मला हा सन्मान लाभला. त्यांच्या प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वादामुळेच मी आज या क्षणाची साक्षीदार ठरले, याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन, असेही तेजस्वी घोसाळकर यांनी नमूद केले.
दरम्यान, या भेटीने मला दहिसरच्या न्याय, विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आणखी जोमाने, अधिक वेगाने आणि अधिक जबाबदारीने काम करण्याची नवी ऊर्जा दिली आहे. दहिसरचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा माझ्या सार्वजनिक जीवनातील एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे आणि या प्रेरणेच्या बळावर आपण दहिसरला विकासाच्या नव्या शिखरावर नेऊ, असा ठाम विश्वास व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.
ज्यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वागताची सुवर्णसंधी आज मला लाभली. ही माझ्यासाठी केवळ औपचारिक भेट नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी प्रेरणादायी ऊर्जा… pic.twitter.com/1iL6Njqyry
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) February 17, 2026