Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:14 AM2019-10-19T01:14:28+5:302019-10-19T07:08:09+5:30

- गौरीशंकर घाळे मुंबई : मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या कुलाबा मतदारसंघात सध्या घमासान सुरू आहे. महिनाभरापूर्वीपर्यंत आघाडीचे आमदार या ...

Colleagues at the Legislative Council mingled with each other | Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले

Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले

Next

- गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या कुलाबा मतदारसंघात सध्या घमासान सुरू आहे. महिनाभरापूर्वीपर्यंत आघाडीचे आमदार या नात्याने विधान परिषदेतील विरोधी बाकांवर बसणारे दोन जण विधानसभेतील एन्ट्रीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेसकडून भाई जगताप येथे उमेदवार आहेत. अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कुलाब्यात तुल्यबळ लढत सुरू आहे.


विशेष म्हणजे नार्वेकरांसाठी भाजपने विद्यमान आमदार राज पुरोहित यांचा पत्ता कापला. २०१४च्या मोदी लाटेत वाहून गेलेला पारंपरिक बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसने भाई जगताप यांना रिंगणात उतरविले. दोन्ही उमेदवारांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. या तुल्यबळ लढतीमुळे कुलाब्यातील राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडून राडा होणार नाही, यासाठी प्रशासनाला दक्ष राहावे लागत आहे.

जमेच्या बाजू
मुंबईतील काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते. कामगार, क्रीडा क्षेत्रातील स्वत:चे नेटवर्क जमेची बाजू. दोन वर्षांपासूनच मतदारसंघात ठाण मांडून तयारी चालविल्याचा फायदा. विभागातील कोळीवाडे, चाळी- झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा विधान परिषदेत लावून धरल्याचा फायदा.
विधानसभा मतदारसंघातील दोन वॉर्डमध्ये घरचेच नगरसेवक. पत्नी आणि बंधू पालिकेत नगरसेवक असल्याने, स्थानिक गणिते आपल्या बाजूने फिरविण्याची क्षमता. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वर्गातील वावर जमेची बाजू. भाजपचे पक्ष संघटन मजबूत असल्याचाही फायदा.


उणे बाजू
एकीकडे उच्चभ्रू तर दुसरीकडे कोळीवाडे आणि झोपडपट्टी अशी वस्ती. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमधील विशेषत: गुजराती, मारवाडी मतदार आपल्याकडे वळविण्याचे मोठे आव्हान. पक्षांतर्गत राजकारणात काही गटांकडून जगताप यांची बाहेरचा उमेदवार अशी संभावना.
ऐन वेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळविले. त्या आधी शिवसेनेत होते. त्यामुळे दलबदलू असा आरोप विरोधी गटांकडून सुरू आहे. कोळीवाडे, झोपु योजनेतील भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवाय, विद्यमान आमदाराचा पत्ता कापून बाहेरच्याला संधी दिल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना.

Web Title: Colleagues at the Legislative Council mingled with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.