Malegaon Municipal Election 2026 : नेत्यांच्या प्रचार रॅलींना प्रोफेशनल टच; डिजिटल माध्यमांचा वापर; प्रचाराचे चित्रीकरण करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:44 IST2026-01-08T15:43:31+5:302026-01-08T15:44:32+5:30
Malegaon Municipal Election 2026 : प्रत्येक घरापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारपत्रके पोहोचविण्यापासून ते मतदानाच्या स्लीप वितरणापर्यतची जबाबदारी या कंपन्या पार पाडत आहेत.

Malegaon Municipal Election 2026 : नेत्यांच्या प्रचार रॅलींना प्रोफेशनल टच; डिजिटल माध्यमांचा वापर; प्रचाराचे चित्रीकरण करण्यावर भर
नाशिक : राजकीय कार्यक्रमांचे नियोजन, प्रचार सभा, सोशल मीडिया, मीडियाचे विश्लेषण, प्रचार अभियानांची रचना आणि नेत्यांच्या संदेशांचे प्रसारण योग्य पद्धतीने व कमी वेळात व्हावे, यासाठी प्रचाराची पद्धत बदलत असून, कार्यकर्त्यांबरोबरच आता प्रोफेशनल इव्हेंट कंपन्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पांच लाखांपासून ५० लाखापर्यंतचे पॅकेजेस देण्यात येत आहेत.
शहरातील ७० हून अधिक इव्हेंट कंपन्यासाठी त्यासाठी कार्यरत आहेत. मतदानासाठी आठ दिवस उरले असताना, प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचणे उमेदवारासाठी शक्य होत नाही. अशा परिस्थितीत इव्हेंट कंपन्या उमेदवारासाठी देवदूत ठरत आहेत.
प्रत्येक घरापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारपत्रके पोहोचविण्यापासून ते मतदानाच्या स्लीप वितरणापर्यतची जबाबदारी या कंपन्या पार पाडत आहेत. प्रचारादरम्यान लाऊडस्पीकरद्वारे उमेदवाराचा प्रचार करणे, वाहनांवर डिजिटल स्लाइड्स बसवून उमेदवार व पक्षाचा प्रचार करणे.
याशिवाय, उमेदवारांच्या ३ पदयात्रा, रॅली आणि सभा यांचे नियोजन करणे, अशी विविध कामे इव्हेंट कंपन्यांकडून केली जात आहेत. विशेष म्हणजे, पदयात्रा सुरू असतानाच त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते त्वरित सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत.
प्रचार दौऱ्यांचे व्हिडीओ संदेश व्हायरलची क्रेझ
सोशल मीडिया हे आजच्या प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरले असून, उमेदवारांचे व्हिडीओ संदेश, भाषणे, रॅलींचे थेट प्रसारण, तसेच प्रचार दौऱ्यांचे व्हायरल व्हिडीओ तयार करून फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि व्हॉट्सअॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. अनेक कार्यकर्त्याकडे आवश्यक ते तांत्रिक ज्ञान आणि सोशल मीडिया अवेअरनेस नसल्याने ही जबाबदारी इव्हेंट कंपन्यांनी स्वीकारली आहे. याशिवाय, उमेदवाराच्या दैनंदिन प्रचार खर्चाचा हिशेब ठेवणे, वाहनांची व्यवस्था, स्टेज, साऊंड सिस्टीम, लाईटिंग, बॅनर, फ्लेक्स आर्दीचे नियोजनही इव्हेंट कंपन्यांकडून केले जात आहे.
खर्चाच्या नियोजनाकडेही आयोगाचे लक्ष
प्रचारात होणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोगाचे लक्ष असल्याने, खर्चाचा अचूक लेखाजोखा ठेवण्याचे कामही या कंपन्यांवर सोपवले जात आहे. पूर्वी प्रचार म्हणजे कार्यकत्यांच्या जोरावर चालणारी प्रक्रिया होती; मात्र आत्ता त्याला कॉर्परिट व्यवस्थापनाचा स्पर्श मिळाला आहे. नियोजनबद्ध प्रचार, वेळेचे अचूक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे उमेदवाराची प्रतिमा अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे. एकूणच, बदलत्या काळानुसार राजकीय प्रचाराचे स्वरूप बदलत असून, इव्हेंट कंपन्यांचा प्रोफेशनल टच निवडणूक रणधुमाळीत निर्णायक ठरत आहे.