Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:09 IST2026-01-01T16:08:46+5:302026-01-01T16:09:50+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मालेगाव पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे.

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप
प्रवीण साळुंके
मालेगाव मालेगाव पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे. या यार्दीनुसार शहरातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षामध्ये उमेदवार निवडताना कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे.
अपवाद वगळता सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीतच तिकिटे देण्यात आल्याचे दिसत आहे. पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, सून, नातू, पुतण्या अशा नातलगांचा समावेश आहे. या घराणेशाहीतून एकही पक्ष सुटलेला नाही. मालेगाव महापालिका देखील त्यास अपवाद नाही. कॉंग्रेस पक्षाने शहराच्या पूर्व भागात २० उमेदवारांना पक्षातर्फे रिंगणात उतरविले आहे. या उमेदवारांमध्ये शहराध्यक्ष एजाज बेग, त्यांची पत्नी यास्मीन बेग व भाऊ रियाज बेग यांना तिकीट दिले.
इस्लाम पार्टी - माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीकडून ते स्वतः निवडणुकीत भाग घेत नसले तरी त्यांच्या कुटुंबातील दोघांना पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात मनपाच्या दोनवेळच्या माजी महापौर ताहेरा शेख रशीद व माजी आमदार शेख यांचे बंधू इमरान शेख यांचा समावेश आहे.
समाजवादी पार्टी - समाजवादी पार्टीतर्फे महापालिका निवडणुकीसाठी माजी आ. पै. निहाल अहमद याची कन्या माजी नगरसेविका शान-ए-हिंद, तसेच त्याचे पती मुस्तकीन डिग्निटी या दोघांना निवडणुकीत उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोघा पती-पत्नीच्या नेतृत्वात समाजवादी मनपा निवडणूक लढवीत आहेत.
शिंदेसेना - शिंदेसेनेने मनपा निवडणुकीसाठी ६ प्रभागातून २४ उमेदवारांना निवडणूक रिंगणात उत्तरविले आहे. माजी तिरोधी पक्षनेता कै. दिलीप पवार यांच्या पत्नी माजी नगरसेविका जिजाबाई पवार यांना प्रभाग १ मधून, तर त्यांचे पुत्र विशाल पवार यांना प्रभाग १० मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या पत्नी लताबाई घोडके यांना प्रभाग ९, तर त्यांचे जावई विनोद वाघ प्रभाग १२ मधून निवडणूक रिंगणात आहेत.
भाजप - भाजपने पश्चिम भागातील ५ प्रभागातून २० उमेदवार दिले आहेत. माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश असून गायकवाड हे प्रभाग १० मध्ये, त्यांचे लहान बंधू माजी नगरसेवक मदन गायकवाड प्रभाग १२, तर माजी गटनेता गायकवाड यांचे पुत्र दीपक गायकवाड है निवडणुकीत उतरले आहेत.
उद्धवसेना - उद्धवसेनेने ११ उमेदवारांना निवडणुकीत उतरविले आहे. त्यात प्रभाग ९ मधून कैलास तिसगे व त्यांच्या पत्नी कोकिळा तिसगे यांना उमेदवारी दिली आहे. कैलास तिसगे है ९ क्रमांकाच्या प्रभागातील 'ड' जागेवर, तर त्यांच्या पत्नी कोकिळा तिसगे या 'ब' जागेवर उद्धवसेनेतर्फे उमेदवारी करत आहेत.