Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:22 IST2025-12-31T16:21:21+5:302025-12-31T16:22:11+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावी भाजप आणि शिंदेसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील अशा राजकीय हालचाली सुरू होत्या.

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
नाशिक: मालेगाव महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युती अखेर नाट्यमयरीत्या संपुष्टात आली तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचेही सूर जुळले नसल्याने मालेगावातील महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये अखेरपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या; परंतु शिंदेसेनेकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा आरोप करीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याचा इशारा पक्षश्रेष्ठींना दिल्याने अखेर मंगळवारी (दि. ३१) युतीची बोलणी थांबली.
मालेगावी भाजप आणि शिंदेसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील अशा राजकीय हालचाली सुरू होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस राहिलेला असतानाही दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात एकमत होत नसल्याने युतीसंदर्भात आधीच अनिश्चितता निर्माण झाली होती. भाजप आणि शिंदेसेना अखेर यांच्यातील जागावाटपाचा तिढा न सुटल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याने महायुती दुभंगली.
जागेचा तिढा
मालेगावात भाजपने भूसे विरोधकांना पक्षात एन्ट्री दिल्याने या ठिकाणी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात युती होणार का? असा प्रश्न निर्माण झालेला होताच. तरीही वरिष्ठ पातळीवरून युती म्हणून लढण्याची बोलणी सुरू झाली होती. स्थानिक पातळीवर यासंदर्भातील बैठकांचे सत्र देखील सुरू होते. येथील २२ जागांपैकी भाजपला १० जागांची अपेक्षा होती.
शिंदेसेनेकडून केवळ ८ जागांचा २ प्रस्ताव देण्यात आल्याने हा प्रस्ताव सन्मानजनक नसल्याने भाजपच्या नेत्यांनी अखेर युती न करण्याची निर्णायक भूमिका घेतली होती. भाजपमध्ये दाखल झालेले अद्वय हिरे, बंदुकाका बच्छाव, यांच्यासह माजी गटनेते सुनील गायकवाड या भाजप नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
नाराजीनंतर निर्णय
भाजपच्या नाराज नेत्यांनी युतीसाठी थेट नकार देत आत्मसन्मानासाठी भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. तसे झाले नाही तर पक्षात फूट पडेल आणि पक्षवाढीवरही त्याचा परिणाम होईल, अशी उघड भूमिकाच अद्वय हिरे आणि बच्छाव यांनी घेतली होती. भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी तर आपण पक्षाचे नेतृत्वच करणार नसल्याची भूमिका घेत नाराजीचे संकेत दिले होते. अखेर सोमवारी (दि. ३१) पक्षाच्या वरिष्ठांकडून स्थानिक नेतृत्वाच्या भावनेची दखल घेण्यात येऊन स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठीक आहे, भाजपबरोबर युती जरी नाही झाली, तरी आम्ही आमच्या उमेदवारांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहून ही निवडणूक लढणार आहोत. उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिंदेसेनेचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.
- मनोहर बच्छाव, तालुकाध्यक्ष, शिंदेसेना
युती जवळपास सर्वच ठिकाणी फिसकटली आहे. मात्र, ही निवडणूक आम्ही ताकदीने आणि स्वबळावर लढणार आहोत. मागील वेळेस आम्हाला ९ जागांवर जनतेने निवडून दिले होते. यावेळेस हा आकडा १४ ते १५ पर्यंत जाणार असल्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.
- देवा पाटील, शहराध्यक्ष, भाजप.
युती झाली असती तर चांगले झाले असते. मत विभागणी टाळता आली असती. मात्र, निवडणुकीत आम्ही आमच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी आमची पुढील भूमिका ठरणार आहे.
- किशोर इंगळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)