Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:15 IST2025-12-26T13:12:08+5:302025-12-26T13:15:27+5:30
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून राजकीय युती-आघाड्यांबाबत खलबते सुरू झाली आहेत.

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून राजकीय युती-आघाड्यांबाबत खलबते सुरू झाली आहेत, झपाट्याने बदलणारी राजकीय समीकरणे आणि स्थानिक राजकारण यावर आधारित आता राजकीय पक्षांकडून गणिते आखली जात आहेत. त्यातूनच मालेगावात एमआयएम आणि काँग्रेस असा नवा प्रयोग होणार असल्याचे दिसत आहे.
या निवडणुकीत एमआयएम हा पक्ष काँग्रेसशी युती करण्याच्या प्रयत्नात असून या संदर्भातील त्यांच्यात बोलणी सुरू असल्याचे कळते. मात्र बोलणी अयशस्वी झाल्यास एमआयएम स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती एमआयएमचे मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती महंमद इस्माईल यांनी दिली. उभयतांमध्ये युती झाल्यास मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम आणि काँग्रेस हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जातील. शहराच्या पूर्व भागात महापालिकेच्या २१ प्रभागांतील १६ प्रभाग आहेत. या १६ प्रभागात ६४ सदस्य संख्या आहे. या भागात खरी चुरस दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये होत आहे. यंदा ही निवडणूक माजी आमदार आसिफ शेख यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंट व एमआयएम यांच्यात होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून तयारी सुरू आहे.
समाजवादी 'इस्लाम'चे काही जागांवर एकमत
समाजवादी पार्टी व 'इस्लाम' यांची युती झाल्याने काही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. त्यापाठेपाठ एमआयएम व काँग्रेस यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू झाली आहे. त्यावर अद्याप एकमत न झाल्याने युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आगामी काळात ही युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव मनपात पहिल्यांदाच एमआयएम काँग्रेस युती पाहावयास मिळणार आहे.
पूर्व भागातील सर्व जागा स्वबळावर लढविणार
या निवडणुकीत पक्ष फक्त काँग्रेसशी युती करणार असून त्यांची तशी बोलणी सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर ही युती झाली नाही तर पक्ष पूर्व भागातील सर्व जागा स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे त्यांनी चाचपणी सुरू केली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. या मनपा निवडणुकीत उमेदवारी देताना जुन्या निष्ठावंतांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर इतरांच्या नावांचा विचार करण्यात येणार आहे.
काही जागा वाटपावरून बोलणी रखडलेली
मनपा निवडणुकीसाठी एमआयएम यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू आली असून, मनपात पहिल्यांदाच ते एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यात ही बोलणी एका प्रभागातील जागांवरून रखडलेली असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस सदर प्रभागात चारही जागा मागत असून दुसरीकडे एमआयएम या प्रभागात समसमान म्हणजे प्रत्येकी २ जागा देण्यास तयार आहे.